BMC Elections 2026: मुंबई महापालिकेच्या (BMC) 2026 च्या निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असताना, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये उत्सुकतेसोबतच थोडी घालमेलही पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीसाठी गुरुवारी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, प्रशासनाकडून मतदारांना आधीच आवश्यक तयारी करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नियमित मतदारांना मतदान प्रक्रिया परिचित असली तरी, प्रथमच मतदार यादीत नाव नोंदवून मतदान करणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. राज्य निवडणूक आयोग आणि मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अंतिम मतदार यादीत ज्यांचे नाव आहे, त्यांनाच मतदानाचा अधिकार असेल. त्यामुळे मतदान केंद्रावर जाण्याआधी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
मतदार यादीत नाव कसे तपासाल?
मतदार आपली माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर सहज तपासू शकतात. ‘mahasecvoterlist.in’ या पोर्टलवर नाव, विधानसभा मतदारसंघ किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक टाकून शोध घेता येतो. नावाने शोध घेताना मुंबई शहर किंवा उपनगर जिल्हा निवडणे, तसेच वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकल्यास अचूक माहिती मिळण्यास मदत होते.
नाव सापडल्यानंतर मतदाराला त्याचा अनुक्रमांक, वॉर्ड क्रमांक आणि मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता (इमारत व खोली क्रमांकासह) स्क्रीनवर दिसतो. ही माहिती सेव्ह करून ठेवण्याचा किंवा प्रिंट काढण्याचा सल्ला निवडणूक आयोगाने दिला आहे. मात्र, ही स्लिप ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
याशिवाय, भारत निवडणूक आयोगाच्या ‘voters.eci.gov.in’ या वेबसाइटवर किंवा ‘Voter Helpline App’द्वारेही माहिती तपासता येते.
मतदानाच्या दिवशी काय सोबत न्यावे?
मतदानासाठी जाताना वैध आणि मूळ छायाचित्र असलेले ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक आहे. आधार कार्ड, पासपोर्ट किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदान केंद्रावर चालते. ओळखपत्र नसल्यास मतदान करता येणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अडचण आल्यास कुठे संपर्क साधाल?
जर एखाद्या मतदाराचे नाव यादीत सापडले नाही किंवा अन्य काही अडचण निर्माण झाली, तर केंद्रीय हेल्पलाईन क्रमांक 1916 वर संपर्क साधता येतो. तसेच, बीएमसी निवडणूक कक्षाचे 022-22754028 किंवा 9619512847 हे क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
बीएमसी निवडणूक: आकडेवारी आणि महत्त्व
यंदाच्या निवडणुकीत बीएमसीच्या एकूण 227 जागांसाठी सुमारे 1,700 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 879 महिला आणि 821 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. मुंबईत तब्बल एक कोटीहून अधिक पात्र मतदार आहेत. महाराष्ट्रातील 29 महापालिकांसोबतच बीएमसीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून, निकाल दुसऱ्या दिवशी जाहीर होणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हातात जाणार असल्याने, ही निवडणूक मुंबईकरांसाठी विशेष महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांनी कोणताही गोंधळ टाळून आपला लोकशाही हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.