नालासोपारा: नालासोपाऱ्यातील श्रीपस्था परिसरातील दोन शाळांना आज सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. राहुल इंटरनॅशनल स्कूल आणि मदर मेरी ज्युनिअर कॉलेज या शाळांना सकाळी 4 वाजून 26 मिनिटांनी हा मेल आला असून, यामध्ये राम मंदिराच्या काही कारणामुळे शाळेच्या इमारतीचं नुकसान केलं जाणार असल्याचा उल्लेख आहे. मेलमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की, 'आम्हाला कुणालाही मारायचं नाही, पण इमारतीचं नुकसान करणार आहोत. दोन वाजेपर्यंत शाळा खाली करा, 800 किलो आरडीएक्स शाळेत ठेवले आहे.'
हेही वाचा: जनतेच्या पैशाचा गैरवापर? राष्ट्रीय परिषदेत खासदार-आमदारांना चांदीच्या ताटात शाही भोजन
या मेलमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, तातडीने वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल, नालासोपारा पोलीस, सायबर सेल, खंडणी विरोधी पथक, आणि क्राईम ब्रँच युनिट 3 चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा: एमडी ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपीला व्हीआयपी वागणूक
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाने तात्काळ सावध पवित्रा घेत विद्यार्थ्यांना घरी पाठवून दिलं असून, संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. पालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. बारा वाजेपर्यंत बॉम्ब शोध पथक घटनास्थळी पोहोचले नव्हते, यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
धमकीचा ई-मेल दक्षिण भारतातून आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून ई-मेलचा तपशीलवार तपास सुरू असून, मेल पाठवणाऱ्याचा माग काढण्यासाठी सायबर विभागाकडून माहिती गोळा केली जात आहे.