Sunday, February 15, 2026 07:59:58 AM

Sanjay Raut : छगन भुजबळ 'क्लीन चिट' प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकारण तापलं; राऊतांचा भाजपवर 'सर्वात ढोंगी पक्ष' म्हणून पलटवार

छगन भुजबळ प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

sanjay raut  छगन भुजबळ क्लीन चिट प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकारण तापलं राऊतांचा भाजपवर सर्वात ढोंगी पक्ष म्हणून पलटवार

मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, या निर्णयावर विविध पक्षांकडून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अडीच वर्षे तुरुंगवास भोगलेल्या भुजबळ प्रकरणावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांना होताना दिसत आहेत. 

मंत्री छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणावरून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, देशातील एकमेव अशी ही खोटी आणि बनावट केस होती, ज्यामध्ये एका कॅबिनेट मंत्र्याला जाणीवपूर्वक अडकवून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आणि तब्बल अडीच वर्षे तुरुंगात डांबून ठेवले.

“महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ सातत्याने आपण निर्दोष असल्याचा दावा करत होते. ते ओरडून सांगत होते की आपण कोणत्याही गैरव्यवहारात सहभागी नाही. तरीही त्यांना अडीच वर्षे जेलमध्ये ठेवलं गेलं. त्या काळातील यातना, मानसिक त्रास आणि सामाजिक बदनामी याची भरपाई आता कोण करणार?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

भाजपवर थेट आरोप करत राऊत म्हणाले की, “भाजपनेच छगन भुजबळ यांच्यावर कारवाई केली, त्यांना चक्की पिसायला जेलमध्ये पाठवले आणि आज त्याच भाजपने त्यांना मंत्री केले आहे. एवढंच नव्हे तर ईडीनेही आता त्यांना इज्जतीत निर्दोष असल्याचं जाहीर केलं आहे.” या संपूर्ण प्रकरणावरून भाजपची दुटप्पी भूमिका उघडी पडल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा: Rupali Patil Thombre Pune : आयोगावर ताशेरे, पोलिसांना विनंती; गुन्हा दाखल झाल्यानंतर रुपाली ठोंबरे Exclusive

“भुजबळ यांच्या आयुष्यातील अडीच वर्षे तुरुंगात गेली. त्या काळात त्यांना अपमान, वेदना आणि त्रास सहन करावा लागला. या सगळ्याची भरपाई आता कोण देणार? भाजप देणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भरपाई देणार आहेत का?” असे थेट प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. “भुजबळांना चक्की पिसायला पाठवलंच, पण आता अजित पवार यांनी भुजबळांच्या बाजूलाच चक्की पिसायला पाठवण्याचं नियोजन केलं होतं. आज अजित पवार सुद्धा तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत,” असे म्हणत राऊत यांनी भाजपवर आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

“सगळ्यात ढोंगी आणि खोटी पार्टी जर कुठली असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे,” असा घणाघात करत संजय राऊत म्हणाले की, सत्ता टिकवण्यासाठी आणि राजकीय सूडबुद्धीने भाजपने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला. या प्रकरणातून भाजपची खरी मानसिकता देशासमोर उघडी पडली आहे, असा दावाही त्यांनी केला.

शेवटी संजय राऊत यांनी स्पष्ट मागणी करत म्हटले की, “ईडी आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने छगन भुजबळ यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. निर्दोष व्यक्तीला वर्षानुवर्षे तुरुंगात ठेवणं हा अन्याय असून, त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे.”

हेही वाचा: Georgia Shooting : अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीचे क्रूर कृत्य; तीन नातेवाईक आणि पत्नीवर झाडल्या गोळ्या


सम्बन्धित सामग्री