धुळे सिव्हिलमध्ये रुग्णांची हेळसांड? डोक्यातून रक्तस्राव होत होता, तरी 19 तास उपचार नाही; नेमकं काय घडलं?

शिरपूरहून धुळे सिव्हिलमध्ये रेफर केलेल्या दोन रुग्णांना गंभीर दुखापत असूनही 19 तास उपचाराची प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप आहे.

धुळे सिव्हिलमध्ये रुग्णांची हेळसांड? डोक्यातून रक्तस्राव होत होता, तरी 19 तास उपचार नाही; नेमकं काय घडलं?
Dhule Civil Hospital

धुळे : शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातून धुळे येथील भाऊसाहेब हिरे सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेल्या दोन रुग्णांना तब्बल १९ तास उपचाराची प्रतीक्षा करावी लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वामन कोळी आणि आनंदा तिरमले या दोन्ही रुग्णांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी धुळे येथील भाऊसाहेब हिरे सर्वोपचार रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. गंभीर दुखापत झाल्याने तातडीने उपचार मिळणे अपेक्षित असताना, रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: हिंगोली अग्नितांडवाचा तिसरा बळी; अग्निशमन कर्मचाऱ्याचा लातूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू, 2 नगरसेवकांसह 16 जण जखमी

डोक्याला मार लागल्याने दोन्ही रुग्णांना रक्तस्राव होत होता. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर रुग्णांना धुळे बसस्थानकावर रात्र काढावी लागल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा रुग्णालयात नेल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. गंभीर अवस्थेतील रुग्णांना वेळेत उपचार न मिळणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

हेही वाचा: नाशिकमध्ये रस्त्याच्या खड्ड्याने घेतला 61 वर्षीय वृद्धाचा जीव; दुचाकीसह खड्ड्यात कोसळून दुर्दैवी मृत्यू

या प्रकरणातील दोषी आढळणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. तसेच प्रशासनाने याबाबत योग्य ती दखल घेतली नाही, तर पक्षाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे, तसेच रुग्णांना उपचार मिळण्यास नेमका विलंब का झाला, याबाबत स्पष्टता होणे गरजेचे आहे. या घटनेची चौकशी झाल्यानंतरच उपचारात हलगर्जीपणा झाला की अन्य काही कारणामुळे विलंब झाला, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, गंभीर अवस्थेतील रुग्णांना तब्बल १९ तास उपचाराची प्रतीक्षा करावी लागल्याच्या आरोपामुळे धुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number