हिंगोली शहरात दिवाळीपूर्वी झालेल्या भीषण फटाका अग्नितांडवाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला होता. या आगीत मृतांचा आकडा हा आता 3 वर पोहोचला आहे. ज्यात हिंगोली नगरपरिषदेचे जखमी कर्मचारी दिलीप दोडके यांचे उपचारादरम्यान लातूर येथे मध्य रात्री 1.30 वाजता निधन झाले.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मारवाडी गल्लीमधील बासटवार यांच्या घरात साठवलेल्या फटाक्यांच्या गोदामासा अचानक आग लागली होती. दिवाळीच्या निमित्ताने आणलेला मोठा फटाक्यांचा साठा हा त्यांनी घरातच ठेवला होता. आग लागल्यानंतर काही क्षणातच कानठल्या बसवणारे स्फोट झाले. पाहता पाहता या आगीने रौद्ररुप धारण केले आणि अनेक घरे, दुकाने जळून खाक झाली.
ही घटना इतकी भीषण होती की आग विझवण्यासाठी आलेली नगरपरिषदेची अग्निशमन गाडी देखील या झालेल्या स्फोटात जळून खाक झाली. या घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे.
मृतांची नावे
फटाका व्यापारी विजय बासटवार (वय76), यांना वाचवण्यासाठी धावून गेलेला अविनाश बांगर (वय26) आणि आता अग्निशमन कर्मचारी दिलीप दोडके. या अग्नितांडवात 16 जण गंभीर भाजले आहेत. दुख:त गोष्ट म्हणजे यात दोन नगरसेवकांचा देखील समावेश आहे. भरत चौधरी आणि कपिल खंडेलवाल. याशिवाय रवी कांबळे, आकाश सांगळे या अग्निशमन दलाच्या जवानांची प्रकृती गंभीर असून त्यांना 300 किमी दूर लातूर आणि संभाजीनगरला हलवण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.