मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. मात्र बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईवरून रणकंदन माजले. अनेकांनी बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप केला. खरचं बोटावरची शाई पुसली जाते की नाही, याचे प्रात्यक्षिक जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या लाईव्ह कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी काही अंशी शाईचा रंग पुसला गेला, मात्र संपूर्ण शाई पुसली गेली नाही.
हेही वाचा : Tejaswini Pandit Post : 'तू आभाळ आभाळ, वादळ तुझं तू राजा...'; राज ठाकरेंना तेजस्विनी पंडितची कवितेतून साद
आज मतदानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोटावरील शाईबाबत गंभीर विधान केले. राज ठाकरे म्हणाले की, "आज तर वेगळेच दिसतेय. शाईऐवजी पेन आणले आहे, त्याची शाई पुसली जातेय. ही काही चांगली लोकशाहीची लक्षणे नाहीत. अशा फ्रॉड निवडणुका घेऊन अशाप्रकारे सत्तेत येणे म्हणजे विजय म्हणत नाहीत. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला मर्यादा असायला हव्यात". तर पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज, गुरुवारी (15 जानेवारी 2026) मतदान प्रक्रिया सुरू असतानाच बोटावरील शाईवरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे निवडणूक आयोगाकडे एक खळबळजनक तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, पुण्यातील प्रभाग क्रमांक 34 (धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक) मध्ये काही महिला आणि मुले बोटाला लावलेली शाई लिक्विडने पुसून पुन्हा बोगस मतदान करत आहेत. शाईऐवजी वापरल्या जाणाऱ्या 'मार्कर पेन'मुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.