बदाम समजून खाल्ल्या एरंडाच्या बिया! 24 विद्यार्थ्यांना विषबाधा, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमध्ये बदाम समजून एरंडाच्या बिया खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.
Kannad News
Kannad News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. बदाम समजून एरंडाच्या बिया खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्व बाधित विद्यार्थ्यांना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड शहरातील हिवरखेडा रोड परिसरातील मदरशात हा प्रकार घडला. सुट्टीच्या दिवशी काही विद्यार्थी परिसरात खेळत होते. यावेळी एका विद्यार्थ्याने झाडावरील एरंडाच्या बिया बदाम समजून खाल्ल्या. त्याचे अनुकरण करत इतर विद्यार्थ्यांनीही त्या बिया खाल्ल्याचे सांगितले जात आहे. काही वेळानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच शिक्षकांनी तातडीने मदत केली. सर्व बाधित विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

रुग्णालयात उपचार सुरू

रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती स्थानिक वृत्तांत देण्यात आली आहे.एरंडाच्या बियांमध्ये विषारी घटक असू शकतात. त्यामुळे त्या खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. लहान मुलांनी अनोळखी बिया, फळे किंवा वनस्पतींचे भाग खाणे टाळावे, याची जाणीव पालक आणि शिक्षकांनी करून देणे आवश्यक आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version