नवी दिल्ली: 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षे कायदेशीर लढाई लढल्यानंतर निर्दोष मुक्तता झालेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित (Prasad Purohit) यांना अखेर मोठी बढती मिळाली आहे. विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर त्यांना आता 'लेफ्टनंट कर्नल' वरून 'कर्नल' या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे त्यांचा सेवेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रसाद पुरोहित सध्या 54 वर्षांचे आहेत.
नऊ वर्षे तुरुंगवास आणि कायदेशीर संघर्ष
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणी तब्बल 17 वर्षे कायदेशीर खटला चालला. यानंतर
कर्नल प्रसाद पुरोहित यांना या प्रकरणात तब्बल नऊ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. आपल्याला राजकीयदृष्ट्या अडकवण्यात आले, असा युक्तिवाद त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता.
पदोन्नती प्रक्रिया: नुकताच न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीवरील 16 वर्षांपासूनची बंदी उठवण्यात आली. लष्कराच्या सूत्रांनुसार, पदोन्नतीची आणि इतर सेवा हक्क पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, जी आता पूर्ण झाली आहे. पुरोहित हे 1994 मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सामील झाले होते.
हेही वाचा - Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 7 निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस; 6 आठवड्यांत द्यावे लागणार उत्तर
विशेष न्यायालयाने काय म्हटले?
एनआयएच्या विशेष न्यायालयाने 31 जुलै 2025 रोजी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून प्रसाद पुरोहित यांची निर्दोष सुटका केली. न्यायालयाने आपल्या आदेशात अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला.
पुरावे कमकुवत : 'पुरोहित यांच्या निवासस्थान A-9 मध्ये कोणतेही आरडीएक्स, स्फोटक पदार्थ किंवा संशयास्पद बॉम्ब बनवण्याच्या वस्तू सापडल्या नाहीत.' न्यायालयाने स्पष्ट केले की, 'फिर्यादी पक्षाची कहाणी पूर्णपणे संशय आणि अनुमानांवर आधारित होती आणि त्याला समर्थन देण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत.' यामुळे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.
निष्कर्ष: 'कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय, कर्नल प्रसाद पुरोहित यांनी जम्मू आणि काश्मीरमधून आरडीएक्स आणले, ते घरात लपवले आणि नंतर बॉम्ब बनवला हे गृहीतक केवळ अनुमानांवर आधारित होते. पुराव्याअभावी फिर्यादी पक्षाचा खटला निष्प्रभ ठरला.'
दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर संघर्षात अखेर विजय मिळाल्यानंतर आता कर्नल प्रसाद पुरोहित यांना मिळालेली ही बढती त्यांच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब करणारी आहे, असे म्हटले जात आहे.
हेही वाचा - Mumbai Rain Forecast: मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी; अरबी समुद्रात उच्च भरती-ओहोटीची शक्यता
स्फोटाची पार्श्वभूमी
दरम्यान, 29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे मशिदीजवळ ठेवलेल्या मोटारसायकलमध्ये स्फोट झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला तर 100 जण जखमी झाले होते. या प्रकरणात सुरुवातीला एटीएसने तपास करून सात जणांना अटक केली होती. मात्र, नंतर एनआयएने तपास हाती घेतल्यानंतर आरोप सौम्य केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.