महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, हवामान, वाहतूक, स्थानिक घटना आणि महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट मिळवा एकाच ठिकाणी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडतंय, जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससह.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
live update maharashtra

LIVE NEWS & UPDATES

  • 29 Oct 2026 08:13 AM (IST)

    धारावी पुनर्विकासासाठी देवनार कचराभूमी रिकामी होणार; 12 पोकलेनसाठी 7.72 कोटींचा खर्च

    धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार कचराभूमीची 124.3 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कचरा हटवण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे देवनार कचराभूमीवरील दैनंदिन कामकाजासाठी मुंबई महापालिका 12 पोकलेन यंत्रे 400 दिवसांसाठी भाड्याने घेणार असून, त्यासाठी 7.72 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. बायोमायनिंगच्या कामाला वैधानिक परवानग्यांमुळे विलंब होत असून, कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्पही अद्याप कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे देवनार कचराभूमीचा प्रश्न मार्गी कधी लागणार, याकडे लक्ष लागले आहे

  • 29 Oct 2026 07:59 AM (IST)

    अमरावतीत अप्पर धरणाच्या कालव्यात शेतकरी वाहून गेला; शोधमोहीम सुरू

    अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात अप्पर धरणाच्या मुख्य कालव्यात हातपाय धुण्यासाठी उतरलेले 52 वर्षीय पिंटू उर्फ दिवाकर माहोरे पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. काल दुपारी ही घटना घडली असून, अद्याप त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. शोध आणि बचाव पथकाकडून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रब्बी हंगामासाठी कालव्यात पाणी सोडण्यात आलं असताना ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • 29 Oct 2026 07:46 AM (IST)

    शिंदखेड्यात कोयता घेऊन दहशत; अशोक सिनेमा हॉलजवळ तरुणावर गुन्हा दाखल

    धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरात अशोक सिनेमा हॉलजवळ हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या रोशन एकनाथ चौधरी याला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतलं. त्याच्याकडून लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 29 Oct 2026 07:29 AM (IST)

    नाशिकमध्ये 5 लाखांहून अधिक शेतकरी संकटात; 485 कोटींच्या मदतीची प्रतीक्षा

    नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा 5 लाख 16 हजार 260 शेतकऱ्यांना फटका बसला असून, 2 हजार 409 गावांमधील 5 लाख 7 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईसाठी 485 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून, अंतिम नुकसान अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी मदत मिळणार का, याकडे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • 29 Oct 2026 07:29 AM (IST)

    नाशिकमध्ये 31 ऑक्टोबरला रामकुंडावर ऐतिहासिक ध्वजारोहण; पंचवटीतील 11 रस्ते बंद, 71 शाळांना सुट्टी

    नाशिकच्या रामकुंडावर 31 ऑक्टोबरला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा होणार आहे. यासाठी पंचवटीतील 11 रस्ते सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार असून, 71 शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भाविकांसाठी 10 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, 15 ते 20 हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • 29 Oct 2026 07:25 AM (IST)

    गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक आज 11 वाजता; महायुतीचे संचालक उपस्थित राहणार?

    कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज सकाळी 11 वाजता होणार आहे. संचालकपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 13, तर महायुतीचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 14 संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे संचालक कर्नाटक दौऱ्यावरून, तर महायुतीचे संचालक गोवा दौऱ्यावरून कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महायुतीचे संचालक उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number