रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील करंबवणे खाडीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या चार दिवसांपासून खाडीच्या पाण्याला काळा रंग आला असून, पाण्यावर फेसही दिसत आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खाडीत मासळी मिळत नसल्याची तक्रार असतानाच आता काळ्या आणि फेसाळ पाण्यामुळे मच्छीमारांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा हा परिणाम आहे की खाडीत सुरू असलेल्या ड्रेझिंगमुळे हा प्रकार घडतोय.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील गोरक्षक गोशाळेत चारा टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. गोशाळेतील १२५ जनावरांसाठी दररोज एक टनापेक्षा अधिक चाऱ्याची गरज असताना हिरवा आणि वाळलेला चारा मिळवणं कठीण झालं आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणी वाढल्या असून, शासनाकडून अपेक्षित आर्थिक मदत मिळत नसल्याची तक्रार गोशाळा चालकांनी केली आहे. त्यामुळे जनावरांसाठी तातडीने चारा आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निंबा येथील अल्पभूधारक शेतकरी गोपाल राठोड यांच्या घराला न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात सील लावण्यात आले आहे. २०१८ मध्ये घेतलेल्या १ लाख रुपयांच्या गृहकर्जाची थकबाकी वाढून १ लाख ३८ हजार ३४६ रुपयांवर पोहोचली होती.
छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरातील बिकानेर मिठाईवाल्याच्या उत्पादन युनिटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. यावेळी 19,310 रुपये किमतीचा 63 किलो 500 ग्रॅम संशयास्पद मिठाई आणि अन्नपदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला. यात मावा, कलाकंद, काजू कतली, बेसन बर्फी, लाडू आणि काजू यांचा समावेश आहे. कारवाईनंतर मिठाई उत्पादनाचा परवाना निलंबित करण्यात आला असून, अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार कचराभूमीची 124.3 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कचरा हटवण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे देवनार कचराभूमीवरील दैनंदिन कामकाजासाठी मुंबई महापालिका 12 पोकलेन यंत्रे 400 दिवसांसाठी भाड्याने घेणार असून, त्यासाठी 7.72 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. बायोमायनिंगच्या कामाला वैधानिक परवानग्यांमुळे विलंब होत असून, कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्पही अद्याप कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे देवनार कचराभूमीचा प्रश्न मार्गी कधी लागणार, याकडे लक्ष लागले आहे
अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात अप्पर धरणाच्या मुख्य कालव्यात हातपाय धुण्यासाठी उतरलेले 52 वर्षीय पिंटू उर्फ दिवाकर माहोरे पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. काल दुपारी ही घटना घडली असून, अद्याप त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. शोध आणि बचाव पथकाकडून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रब्बी हंगामासाठी कालव्यात पाणी सोडण्यात आलं असताना ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरात अशोक सिनेमा हॉलजवळ हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या रोशन एकनाथ चौधरी याला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतलं. त्याच्याकडून लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा 5 लाख 16 हजार 260 शेतकऱ्यांना फटका बसला असून, 2 हजार 409 गावांमधील 5 लाख 7 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईसाठी 485 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून, अंतिम नुकसान अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी मदत मिळणार का, याकडे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नाशिकच्या रामकुंडावर 31 ऑक्टोबरला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा होणार आहे. यासाठी पंचवटीतील 11 रस्ते सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार असून, 71 शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भाविकांसाठी 10 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, 15 ते 20 हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज सकाळी 11 वाजता होणार आहे. संचालकपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 13, तर महायुतीचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 14 संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे संचालक कर्नाटक दौऱ्यावरून, तर महायुतीचे संचालक गोवा दौऱ्यावरून कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महायुतीचे संचालक उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.