सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या सह्याद्री पट्ट्यासह नारुर, घोटगे पंचक्रोशी आणि माणगाव खोऱ्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भातकापणी अंतिम टप्प्यात असताना पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे काही भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला. सकाळपासून पावसाने उसंत घेतली असून, जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील निरूळ गंगामाई येथे 65 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी श्रीपतराव कडू यांनी विषारी औषध प्राशन करून टोकाचं पाऊल उचललं. अनियमित पाऊस, सोयाबीन पिकाचं नुकसान आणि दोन लाख रुपयांहून अधिक कर्जामुळे ते आर्थिक संकटात होते. पीडित शेतकरी कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांना विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यांची व्हॅक्यूम क्लिनिंग, पाण्याची फवारणी, बांधकामाच्या राडारोड्यावर नियंत्रण आणि वाहनांच्या प्रदूषणावर कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. तसेच, लाकूड व कोळशावर चालणाऱ्या आणि स्वच्छ इंधनावर रूपांतरित न झालेल्या बेकऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना सुपारी घेतल्याचा दावा करत 10 लाख रुपये मागितल्याची धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शिवसैनिकांनी ठाण्याबाहेर गर्दी करत कारवाईची मागणी केली. जंजाळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या वर्धा नदीच्या डोहाची पातळी 10 फुटांवर आली आहे. कमी पावसामुळे अधिग्रहित विहिरीही आटू लागल्या असून, 17 प्रभागांतील नागरिकांवर लवकरच पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.