महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी; 8 जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’, कुठे कसा पडेल पाऊस?

राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाने या भागांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी; 8 जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’, कुठे कसा पडेल पाऊस?
Rain

Latest Rain Update: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे महाराष्ट्रात पुनरागमन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वातावरणातील अचानक झालेल्या बदलांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. आज, मंगळवारी (दि. 29) राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाने या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पावसाने उघडीप दिल्याने दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढत असतानाच पहाटेच्या वेळी मात्र किमान तापमानात घट झाल्यामुळे काही भागांत गारठा व धुके अनुभवायला मिळत आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली

पूर्व-मध्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून 1.5 ते 4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच उत्तर कर्नाटक ते तमिळनाडू दरम्यान सुमारे 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. दुसरीकडे, म्यानमारच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार झाले असून ते अंदमान बेटांवरील माया बंदरापासून सुमारे 590 किलोमीटर ईशान्येला केंद्रित आहे. ही स्थिती म्यानमार आणि बांगलादेशच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता असून या विविध हवामान प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

या 8 जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील खालील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे:
– कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तुफान वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
– मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
– मराठवाड्याला लागून असलेल्या सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा – ऐन अंगारकीला वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाचा इशारा; या राज्यांना हवामान खात्याचा रेड अलर्ट! महाराष्ट्राची स्थिती काय?

राज्यातील तापमानातील चढ-उतार
सोमवारी (दि. 28) सकाळपर्यंतच्या 24 तासांच्या कालावधीत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 36.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी 15.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. याशिवाय धुळे येथील कृषी महाविद्यालयात 16.5 अंश आणि परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 16 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे.

मान्सूनच्या परतीचा प्रवास आणि पुढील स्थिती

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी (दि. 23) राजस्थान, पंजाब, हरियाणा तसेच दिल्ली आणि गुजरात, उत्तर प्रदेशच्या काही भागांतून माघार घेतली होती. सोमवारी (दि. 28) मान्सूनच्या परतीची सीमा स्थिर होती. मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील नवीन घडामोडींमुळे पुढील काही दिवस राज्यातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – पृथ्वीच्या अगदी जवळ येणार ‘शनी’; खगोलप्रेमींना दिसणार ग्रहाची कडी अन् अनोखा नजारा, कधी? वाचा सविस्तर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number