पुण्यातील शनिवारवाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आणि संघ परिवारावर जोरदार हल्ला चढवला. “मुरलीधर मोहोळ यांचा जमीन घोटाळा उघड झाल्यानंतर जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे प्रकरण पुढे आणण्यात आलं,” असा थेट आरोप त्यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित सभेत बोलताना जलील म्हणाले, “एका महिलेने नमाजची वेळ झाल्याने शनिवारवाड्यात नमाज अदा केली, यात गैर काय आहे? तिने कुठेही दगड रंगवून ‘हा वाडा आमचा आहे’ असं म्हटलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच मुस्लिम समाजाला विरोध केला नाही, मग आता काही लोक एवढे तापले का? हे हिंदुत्ववादाचे ठेकेदार चिंधीचोर आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा: Sanjay Raut on Mahesh Kothare: तात्या विंचू तुमचा गळा दाबेल..! भाजप प्रेमाची कबुली देताच महेश कोठारेंना संजय राऊतांचा थेट इशारा
ते पुढे म्हणाले, “भाजपच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पॉलिसी म्हणजे मुद्दा बदलणे आणि लोकांचं लक्ष खऱ्या प्रश्नांपासून दूर नेणे. मस्तानीनेही त्या काळात अनेकदा तिथे नमाज अदा केली होती, तेव्हा कोणी आवाज उठवला नव्हता.”
शनिवारवाड्यातील महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची कडक निंदा करत जलील म्हणाले, “फिरण्यासाठी आलेल्या आमच्या बहिणी अजान ऐकून नमाज अदा करतात, त्यावर गुन्हा दाखल करणं म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे.”
याच सभेत त्यांनी बिहार निवडणुकीत एमआयएमच्या सहभागाबाबतही भूमिका मांडली. “भाजप, काँग्रेस आणि आरजेडी हे आमच्यासाठी एकच आहेत. आम्ही निवडणुकीत उतरू आणि बिहारमध्ये सर्वांना धक्का देऊ,” असा दावा त्यांनी केला.
तसेच, पक्षातील संघटनात्मक बैठकीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. कुठे किती जागा लढवायच्या, याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील.”
आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत उल्लेख करत त्यांनी सांगितलं, “माझा मुलगा कधीही निवडणुकीत उतरलेला दिसणार नाही. या घाणेरड्या राजकारणापासून त्याला दूर ठेवणं हेच योग्य आहे,” असे इम्तियाज जलील म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील शनिवारवाडा पुन्हा एकदा राजकीय आणि धार्मिक वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकीकडे भाजप आणि त्यांच्या समर्थकांकडून या घटनेचा निषेध केला जात असताना, दुसरीकडे एमआयएम आणि इम्तियाज जलील यांच्यासारखे नेते याला धार्मिक स्वातंत्र्याशी जोडत आहेत.
हेही वाचा: Share Market Today News : शेअर मार्केट आज सुरू राहणार की बंद ? मोठी अपडेट समोर