Sunday, July 13, 2025 11:16:22 AM

ठाकरे गटाला नाशिकमध्ये जबर धक्का; बडगुजर, घोलपांसह अनेक नेते भाजपमध्ये

नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का देत सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप, दोन माजी महापौर व अनेक नगरसेवक भाजपमध्ये दाखल; फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा.

ठाकरे गटाला नाशिकमध्ये जबर धक्का बडगुजर घोलपांसह अनेक नेते भाजपमध्ये

नाशिक: नाशिक शहरात आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सोबत दोन माजी महापौर आणि इतर प्रमुख नेतेही भाजपमध्ये सामील होणार आहेत. आज दुपारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे वेगवेगळ्या पक्षांतील नेते भाजपकडे वळत आहेत. आजच दहा ते बारा माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपचे राजकीय वजन आणखी वाढणार आहे, तर ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे.

हेही वाचा: अंधेरी पूर्व भागातील महापालिका शाळेत शिकणाऱ्या 700 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

विशेष म्हणजे, यापूर्वी भाजपमध्ये असलेले आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेले गणेश गीते देखील आज पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गीते यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्या पुनरागमनामुळे भाजपला या मतदारसंघात पुन्हा ताकद मिळण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटासाठी ही घडामोड मोठा धक्का मानली जात आहे. बडगुजर आणि घोलप हे दोघेही नाशिकमधील जुने आणि प्रभावी नेते आहेत. त्यांचा भाजपकडे झुकाव ही एक मोठी राजकीय पुनर्रचना मानली जात आहे. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवण्यासाठी हे इनकमिंग सुरू केले आहे.

आजच्या पक्षप्रवेशाने नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. भाजपने आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून, स्थानिक पातळीवर मजबूत नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने हे पावले उचलली जात आहेत. ठाकरे गटासह महाविकास आघाडीला या इनकमिंगमुळे मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा: नवी मुंबई वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस; शव गुंडाळण्यासाठी दोन हजारांची मागणी
 


सम्बन्धित सामग्री