Sunday, November 16, 2025 06:21:17 PM

MSRTC Solar Energy: सौरऊर्जेतून चालणार एसटी! बसस्थानकं आणि कार्यशाळांच्या छतांवर उभारणार प्रकल्प

महामंडळाच्या मालकीच्या तसेच शासनाच्या परवानगीने उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या जागांवर सौर ऊर्जा शेती उभारली जाणार आहे.

 msrtc solar energy सौरऊर्जेतून चालणार एसटी  बसस्थानकं आणि कार्यशाळांच्या छतांवर उभारणार प्रकल्प

मुंबई: राज्य परिवहन महामंडळ आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मोठे पाऊल टाकणार आहे. एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागांवर तसेच बसस्थानकांच्या आणि कार्यशाळांच्या छतांवर ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ उभारून दरवर्षी सुमारे 300 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून दरवर्षी सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या मूल्याची वीज तयार केली जाणार असून, एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाकांक्षी पाऊल असल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले.

परिवहन मंत्रालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सरनाईक यांनी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरनाईक म्हणाले, “भविष्यात संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरेल असा ‘सौर ऊर्जा हब’ एसटी महामंडळ उभारणार आहे. महामंडळाच्या मालकीच्या तसेच शासनाच्या परवानगीने उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या जागांवर सौर ऊर्जा शेती उभारली जाणार आहे. खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार असून, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचाही उपयोग होईल.”

हेही वाचा: Cyclone Alert: महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं सावट? नव्या चक्रीवादळाने टेन्शन वाढलं; पुढील 48 तास अतिशय महत्त्वाचे

सध्या एसटी महामंडळाला आस्थापना वापरासाठी दरवर्षी 15 मेगावॅट वीज लागते, ज्यासाठी 25 ते 30 कोटी रुपयांचे बिल भरावे लागते. आगामी काळात इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगसाठी 280 मेगावॅट अतिरिक्त वीज लागणार आहे. जर ही वीज सौरऊर्जेतून तयार केली, तर दरवर्षी सुमारे 1 हजार कोटी रुपयांची बचत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सरनाईक म्हणाले, “एसटी महामंडळ भविष्यात शासनाच्या ओसाड जागांवर नाममात्र भाडे आकारणी करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारेल. त्यामुळे आर्थिक अनुदानासाठी शासनाकडे हात पसरावा लागणार नाही. उलट ही बचत आणि ऊर्जा निर्मिती एसटीसाठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत ठरेल.”

या प्रकल्पामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ऊर्जा गरज भागवण्यासह, पर्यावरणपूरक विकासालाही चालना मिळणार आहे. राज्यासाठी हा प्रकल्प ‘ग्रीन एनर्जी’च्या दिशेने एक नवा टप्पा ठरेल, असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: Rohit Arya Case: पवईतील आर. ए. स्टुडिओ प्रकरणात नवे उघड: रोहित आर्याशी संपर्कात असलेले मराठी कलाकार चौकशीच्या रडारवर

 

सम्बन्धित सामग्री