Monday, February 09, 2026 02:48:53 PM

BMC Mayor: मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर? नाही! 44 वर्षांचा दुर्लक्षित इतिहास उघड

मुंबई महापालिकेच्या निकालानंतर भाजपचा महापौर होणार हे स्पष्ट झालं असलं तरी इतिहास वेगळी गोष्ट सांगतो. 1982 मध्येच भाजपचा महापौर मुंबईत होऊन गेला होता, ही माहिती पुन्हा चर्चेत आली आहे.

bmc mayor मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर नाही 44 वर्षांचा दुर्लक्षित इतिहास उघड

BMC MAYOR: मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे. मुंबईचा पुढचा महापौर कोण असणार? यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने जोरदार कामगिरी करत ठाकरे गट आणि मनसेला मागे टाकले आहे. भाजपचे 89 तर शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आल्याने युतीकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे भाजपचाच महापौर होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनीही याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

या पार्श्वभूमीवर अनेकजण असा दावा करत आहेत की मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर मिळणार आहे. मात्र, इतिहासाकडे नजर टाकली तर हे चित्र पूर्णपणे बरोबर नाही. प्रत्यक्षात, मुंबईत भाजपचा महापौर यापूर्वीही होऊन गेला आहे आणि आता होणारा महापौर हा भाजपचा दुसरा महापौर ठरणार आहे.

1982 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर डॉ. प्रभाकर संजीव पै हे महापौर झाले होते. त्या काळात राजकीय समीकरणे आजसारखी स्पष्ट नव्हती. महापालिकेच्या 140 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. बहुमतासाठी 71 जागांची आवश्यकता असताना काँग्रेस, शिवसेना, भाजप किंवा डाव्या पक्षांपैकी कोणीही तो आकडा गाठू शकले नव्हते.

त्या काळात भाजप हा तुलनेने लहान आणि नव्याने स्थापन झालेला पक्ष होता. भाजपचे केवळ 19 नगरसेवक निवडून आले होते. विशेष म्हणजे, त्या काळात महापौरपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा नसून फक्त एका वर्षाचा होता. काँग्रेसचे वर्चस्व मोडण्यासाठी शिवसेना, भाजप विचारधारेचे नगरसेवक, अपक्ष आणि समाजवादी पक्षांनी एकत्र येत आघाडी केली. या आघाडीच्या पाठिंब्यामुळे डॉ. प्रभाकर पै यांची महापौरपदी निवड झाली आणि ते भाजपचे मुंबईतील पहिले महापौर ठरले.

डॉ. प्रभाकर पै यांचा जन्म कर्नाटकातील बरकुर या गावात झाला होता. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजसेवेच्या उद्देशाने ते मुंबईत स्थायिक झाले. वांद्रे-खार परिसरात त्यांचा वैद्यकीय व्यवसाय प्रसिद्ध होता. 1968 मध्ये ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले आणि सलग अनेक वर्षे त्यांनी महापालिकेत प्रभावी काम केले. 1982 ते 1983 या कालावधीत त्यांनी महापौरपद भूषवले. त्याचबरोबर बेस्ट समिती आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

ज्येष्ठ पत्रकारांनीही त्यांच्या कार्याची आठवण करून दिली आहे. डॉ. पै हे पक्षाशी आणि विचारसरणीशी प्रामाणिक राहिलेले नेते होते. महापौर असतानाही त्यांनी संघटनेच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याच्या आठवणी आजही सांगितल्या जातात. त्यामुळे आता भाजपचा नवा महापौर मुंबईत विराजमान झाला, तर तो ऐतिहासिकदृष्ट्या भाजपचा दुसरा महापौर ठरेल, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.


सम्बन्धित सामग्री