मुंबई : मुंबईतील शीव परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. तब्बल 112 वर्षे जुन्या शीव रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल 22 ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे शीव, धारावी, कलानगर आणि माहीम परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूल पुन्हा सुरू झाल्याने बेस्ट उपक्रमाने या भागातून धावणाऱ्या 14 बससेवांचे मूळ मार्ग पूर्ववत केले आहेत.
30 जून 2024 पासून पूल होता बंद
शीवच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा हा महत्त्वाचा रेल्वे पूल पुनर्बांधणीच्या कामासाठी 30 जून 2024 पासून बंद करण्यात आला होता. पुलावरील वाहतूक बंद असल्यामुळे बेस्टच्या अनेक बससेवांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. त्यामुळे प्रवासाच्या मार्गात बदल झाले होते. आता पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाल्याने बससेवा पुन्हा पूर्वीच्या मार्गावर आणणे शक्य झाले आहे.
बेस्टच्या 14 बससेवांचे मार्ग पूर्ववत
शीव पूल सुरू झाल्यानंतर बेस्टने 14 बससेवांचे मूळ मार्ग पुन्हा सुरू केले आहेत. यामध्ये 181, 255 लिमिटेड, 348 लिमिटेड, A-312, 341, A-375, AC-505, A-376, A-7, A-22, 29 लिमिटेड, 411, 11 लिमिटेड आणि C-305 या बससेवांचा समावेश आहे.
या बससेवा राणी लक्ष्मीबाई चौक, संत रोहिदास मार्ग आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग यांसारख्या प्रमुख रस्त्यांवरून धावतात. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता अधिक सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
AC बस A-176 च्या मार्गात बदल
बेस्टने AC बस A-176 च्या मार्गात स्वतंत्र बदल केला आहे. आकाशगंगा सोसायटी आणि धारावी बस आगारादरम्यानचा पर्यायी मार्ग रद्द करण्यात आला आहे. ही बस आता संत रोहिदास मार्ग आणि वसंतराव नाईक मार्गावरून राणी लक्ष्मीबाई चौकाच्या दिशेने धावणार आहे. या बदलामुळे धारावी बस आगार आणि काळा किल्ला येथील थांबे या सेवेसाठी बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान, एव्हरार्ड नगर ते कलानगरदरम्यान धावणारी A-356 बस कोणताही मार्गबदल न करता सुरू आहे.
प्रवाशांचा वेळ वाचणार
शीव पूल पुन्हा सुरू झाल्यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच शीव, धारावी, कलानगर आणि माहीमदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गांवरील वळसे टाळता येणार आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि वाहतुकीचा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.