ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात संदल मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या डीजेच्या स्ट्रक्चरवर क्षमतेपेक्षा अधिक भार टाकण्यात आल्याने ते अचानक कोसळले. या अपघातात डीजेसह अनेक जण खाली पडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
प्राथमिक माहितीनुसार, डीजेच्या लोखंडी स्ट्रक्चरवर जास्त लोक चढल्याने आणि अतिरिक्त भार पडल्याने ते कोसळले. या दुर्घटनेत सात जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये काही तरुणांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
अपघात घडल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून काही जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा: Bigg Boss Marathi Season 6 Winner: ‘आले होते तन्वी कोलते म्हणून, जातेय…’ 100 दिवसांच्या संघर्षानंतर ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये कोकणकन्येची दमदार बाजी; ट्रॉफी जिंकल्यावर रितेशने दिली खास भेटवस्तू
या घटनेनंतर मिरवणुकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. डीजे स्ट्रक्चर कोसळण्यामागे नेमके कारण काय, तसेच सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते का, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
दरम्यान, मिरवणुकांमध्ये सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. मोठ्या मिरवणुकांमध्ये डीजे, लाईटिंग आणि लोखंडी स्ट्रक्चर उभारणी करताना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा: PBKS Vs LSG IPL 2026: प्रियांश आर्या नावाचं वादळ घोंगावलं! अवघ्या 37 चेंडूत कुटल्या 93 धावा; पंजाबचा लखनऊवर आयपीएलमधील ऐतिहासिक विजय