नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. धर्माच्या नावाखाली महिलांवर अत्याचार आणि अश्लील कृत्ये केल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
सध्या अशोक खरात अटकेत असून त्याची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून महिलांनी तक्रार नोंदवावी यासाठी राज्य शासनाने हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केला आहे. तपासादरम्यान काही राजकीय व्यक्तींची नावेही चर्चेत आली असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
अटकेमागील थरारक कारवाई समोर
दरम्यान, अशोक खरातच्या अटकेमागील थरारक कारवाईची माहितीही आता समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात नाशिक पोलिसांवर विश्वास दाखवत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना अटकेची रणनीती आखण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार पोलिसांनी एक गुप्त ऑपरेशन आखले. मोबाईल फोन बंद ठेवत पोलिसांनी साध्या वेशात खरातच्या घराभोवती पाळत ठेवली. त्यानंतर घरात चोर शिरल्याचा बहाणा करून पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि योग्य क्षण साधत अशोक खरातला ताब्यात घेतले.
ही संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली. गुन्हे शाखा आणि गुंडविरोधी पथकाने आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करून अखेर या भोंदू बाबाला जेरबंद केले.
हेही वाचा: Gold Silver Rate Today: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; सोनं झालं स्वस्त, आजचे दर पाहा
प्रकरण कसे उघड झाले?
या प्रकरणाचा उलगडा कसा झाला, याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला एका पीडित महिलेने खरातविरोधात कारवाई व्हावी म्हणून एका आमदाराची भेट घेतली होती. त्या वेळी तिने संबंधित व्हिडिओ दाखवत संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला आणि विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली.
मात्र, ज्यांच्यावर विश्वास ठेवून ही माहिती देण्यात आली होती, त्या आमदारानेच हा प्रकार अशोक खरातला सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सावध झालेल्या खरातने प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने एका पीडित महिलेच्या पतीवरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे.
त्यानंतरही पीडित महिलांनी हार न मानता दुसऱ्या एका आमदाराची भेट घेतली. त्या आमदाराने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ निर्णय घेत पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आणि अखेर अशोक खरातला अटक करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईमुळे राज्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली होणारे अत्याचार आणि महिलांवरील गुन्ह्यांवर लगाम बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.