नाशिकमध्ये रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात 61 वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रकाश वंडेशकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना राजीवनगर परिसरात घडली. कलानगरकडून राजीवनगरच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना वंडेशकर यांची दुचाकी रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात थेट कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रस्त्यावर काम सुरू असल्याने मोठा खड्डा खोदण्यात आला होता. रात्रीच्या वेळी परिसरात अंधार असल्याने वंडेशकर यांना खड्ड्याचा अंदाज आला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे त्यांची दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. या दुखापतींमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराच्या कामाच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रशासनाकडून बॅरिकेट्स आणि सूचना फलक लावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्षात रात्रीच्या वेळी ही सुरक्षा व्यवस्था पुरेशी होती का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यावरील खोदकामाच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.