नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे. कल्याण तालुक्यातील तिसगाव परिसरातून या मागणीला नव्याने गती मिळाली असून, स्थानिक ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई 36 KM from Tisgaon’ असे फलक गावात उभारले आहेत. ‘श्री तिसाई ग्रामस्थ मंडळ आणि नियोजन समिती, तिसगाव’ यांच्या सौजन्याने लावण्यात आलेले हे फलक आता हा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.
दि. बा. पाटील हे रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शेतकऱ्यांचे खरे रक्षक मानले जातात. सिडको (CIDCO) आणि जेएनपीटी (JNPT) प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या हजारो शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भूमिपुत्रांना विकसित भूखंड आणि योग्य मोबदला मिळवून देण्यात यश आले. या लढ्यामुळे दि. बा. पाटील हे स्थानिक आगरी-कोळी समाज आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी अस्मितेचे प्रतीक ठरले. म्हणूनच, नवी मुंबई ज्या भूमीवर वसली आहे, त्या भूमिपुत्रांच्या सन्मानार्थ विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.
हेही वाचा: Washim fire incident: वाशिममध्ये पाटणी चौकात भीषण आग, 40 क्विंटल सोयाबीन जळून खाक
महाविकास आघाडीच्या शासनकाळात विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव समोर आला होता. मात्र, या निर्णयाला स्थानिक समाजाचा तीव्र विरोध झाला आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन पेटले. त्यानंतर झालेल्या राजकीय बदलांनंतर राज्य सरकारने दोन्ही सभागृहांत ठराव संमत करून ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता केवळ घोषणा बाकी असल्याचा विश्वास अनेकांना होता.
मात्र, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले, पण त्या वेळी नामकरणाविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. यामुळे भूमिपुत्रांमध्ये पुन्हा एकदा अस्मितेचा प्रश्न पेट घेताना दिसतो आहे.
तिसगावातील ग्रामस्थांनी लावलेले फलक केवळ निषेधाचे प्रतीक नसून, भूमिपुत्रांच्या भावनांचा थेट आवाज ठरले आहेत. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या विमानतळाचे नाव दि. बा. पाटील यांच्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीवर ठेवले जाणे म्हणजे शेतकऱ्यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल. स्थानिक समाजाच्या या ठाम भूमिकेमुळे नामकरणाचा वाद पुन्हा तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, प्रकल्पग्रस्त आणि आगरी-कोळी समाजातील नेतेमंडळी लवकरच राज्य सरकारकडे प्रतिनिधीमंडळ पाठवण्याची तयारी करत आहेत. त्यांचा आग्रह आहे की, सरकारने दि. बा. पाटील यांच्या नावाने नामकरणाचा निर्णय लवकरात लवकर अमलात आणावा.
तिसगावातून उठलेले हे फलक आता प्रतीक बनले आहेत, एका भूमिपुत्राच्या ओळखीचा, संघर्षाचा आणि सन्मानाचा. नवी मुंबईच्या विकासाच्या मुळाशी असणाऱ्या त्या जमिनीच्या अस्मितेला न्याय मिळवून देण्यासाठी आता लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
हेही वाचा: Mehul Choksi Extradition : फरार मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू, भारतात कोणत्या जेलमध्ये ठेवणार