Wednesday, February 18, 2026 09:08:00 AM

Parth Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल; पार्थ पवारांच्या खांद्यावर दिल्लीची धुरा?

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा पार्थ पवारांसाठी वापरण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.

parth pawar अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल पार्थ पवारांच्या खांद्यावर दिल्लीची धुरा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, या धक्क्यातून सावरत असतानाच पवार कुटुंबाने राज्याची धुरा आणि पक्षाची पकड मजबूत ठेवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत एक नवा इतिहास रचला. आता या राजकीय सत्तानाट्यात पुढचे मोठे पाऊल पडण्याची शक्यता असून, अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांची वर्णी राज्यसभेवर लागण्याची दाट चिन्हे आहेत.

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आणि पर्यायाने राज्याच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांनी सक्रिय प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता पार्थ पवार यांना पाठवून दिल्लीच्या तख्तावर राष्ट्रवादीचे वजन वाढवण्याची रणनीती आखली जात असल्याचे सूत्रांकडून समजते. पार्थ पवार आता वडिलांचा वारसा देशपातळीवर पुढे नेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

हेही वाचा: Railway News : रेल्वे येताच प्रवासी लगबगीने पुढे झाले.. अरे, पण हे काय.. डबा कुठेय? प्लॅटफॉर्मवर मोठी धावपळ, शेवटी 'असा' निस्तरला घोळ

विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची मुदत 4 जुलै 2028 पर्यंत, म्हणजेच अजून दोन वर्षांची होती. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते पार्थ पवार यांना केवळ दोन वर्षांच्या मुदतीवर न पाठवता, त्यांना पूर्ण सहा वर्षांची टर्म असलेल्या जागेवर संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यासाठी पार्थ पवारांनी स्वतः मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 2019 च्या मावळ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार यांच्यासाठी ही एक मोठी राजकीय 'कमबॅक'ची संधी मानली जात आहे.

अजितदादांच्या जाण्याने बारामती आणि राष्ट्रवादीची संपूर्ण जबाबदारी आता पार्थ आणि जय पवार या दोन्ही बंधूंच्या खांद्यावर आली आहे. सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे सांभाळतील, तर पार्थ पवार हे दिल्लीत पक्षाचे प्रतिनिधित्व करतील. दुसरीकडे, जय पवार हे स्थानिक स्तरावर पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम पाहतील, असे चित्र स्पष्ट होत आहे. 

येत्या काही दिवसांत राज्यसभेच्या या जागेसाठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. पार्थ पवार जर राज्यसभेवर गेले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दिल्लीतील रणनीतीला एक तरुण चेहरा मिळेल. अजितदादांच्या कडक शिस्तीचा आणि कामाच्या झपाट्याचा वारसा पार्थ पवार किती प्रभावीपणे राबवतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राजकारणात 'वेळ कोणासाठी थांबत नाही' याप्रमाणे, पवार कुटुंबाने घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणारा ठरेल का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

हेही वाचा: Mumbai Mhada Lottery: 'प्रथम येईल त्यास प्राधान्य'; मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाची 'ही' बंपर लॉटरी पाहिलीत का?


सम्बन्धित सामग्री