मुंबईतील माहिम परिसरात रॅपिडो बाइक टॅक्सी चालविणाऱ्या एका व्यक्तीविरोधात दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यादरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो, ओला, उबर चालकांची काटेकोर तपासणी करा आणि दोषींवर गुन्हे दाखल करा असे स्पष्ट निर्देश मोटार परिवहन विभागाला दिले आहेत.
गरज पडल्यास चालकांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी स्वतंत्र सुधारित कायदा करणार असल्याचे देखील प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला ही तपासणी करण्याचे आणि नियमभंग करणाऱ्या तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन कागदपत्रे आणि पार्श्वभूमी यांची सखोल पडताळणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान कोणताही नियमभंग किंवा कायद्याने दखलपात्र गैरप्रकार आढळल्यास, संबंधित चालकांवर नियमानुसार कठोर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील.
ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांचा विस्तार होत असताना या क्षेत्रातील चालकांना लागू असलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सध्याच्या कायद्यांमध्ये किंवा नियमांमध्ये आवश्यक तरतुदी अपुऱ्या ठरत असतील, तर चालकांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सुधारित कायदा तयार करण्याच्या पर्यायाचाही गांभीर्याने विचार करावा, असे निर्देश सरनाईक यांनी दिले.