एलॉन मस्कला ‘पंतप्रधान अंबानी’ हा शब्दप्रयोग भोवला; महाराष्ट्रात सरकार आक्रमक, टेस्लाला मिळणाऱ्या कर सवलतींचा आढावा घेण्याचे निर्देश

देशाच्या सन्मानाचा प्रश्न उपस्थित होताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी टेस्लाच्या करसवलतींविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

एलॉन मस्कला ‘पंतप्रधान अंबानी’ हा शब्दप्रयोग भोवला; महाराष्ट्रात सरकार आक्रमक, टेस्लाला मिळणाऱ्या कर सवलतींचा आढावा घेण्याचे निर्देश
elon musk post

Tesla Tax Exemption Review after Elon Musk Prime Minister Ambani Comment: टेस्ला कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क यांच्या एका सोशल मीडिया पोस्टवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि उद्योग विश्वात नवे वादळ उठले आहे. मस्क यांनी 9 ऑक्टोबर रोजी केलेल्या एका पोस्टमध्ये ‘पंतप्रधान अंबानी’ असा वादग्रस्त उल्लेख केल्याचा आरोप आहे. या वक्तव्याची गंभीर दखल घेत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टेस्लाला मिळणाऱ्या करसवलतींचा पुनर्विलोकन व फेरआढावा घेण्याचे थेट आदेश दिले आहेत. ‘देशाच्या नेतृत्वाचा सन्मान आणि राष्ट्रीय स्वाभिमानापेक्षा कोणतेही व्यावसायिक हित मोठे असू शकत नाही,’ असा सज्जड इशाराच सरनाईक यांनी या माध्यमातून दिला आहे.

महाराष्ट्रात टेस्लाची मोठी बाजारपेठ; विक्रीच्या आकडेवारीवर एक नजर
भारतात इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्राचा वाटा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि टेस्लासाठी हे राज्य सर्वात मोठी बाजारपेठ ठरले आहे. वर्ष 2025 मध्ये संपूर्ण देशात टेस्लाची एकूण 226 वाहने विकली गेली होती, ज्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 140 वाहनांची विक्री झाली होती; म्हणजेच राष्ट्रीय विक्रीत महाराष्ट्राचा वाटा सुमारे 62 टक्के होता. तर चालू वर्ष 2026 मध्ये आतापर्यंत भारतात टेस्लाच्या एकूण 826 वाहनांची नोंदणी झाली असून, त्यातील 282 वाहने एकट्या महाराष्ट्रातील आहेत, ज्याचा एकूण वाटा तब्बल 33 टक्के आहे. अशा मोठ्या बाजारपेठेत मस्क यांच्या विधानामुळे आता कंपनीपुढील अडचणी वाढल्या आहेत.

शून्य टक्के रस्ते करसवलतीचा फेरआढावा; कायद्यानुसार कारवाईचे निर्देश
आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर सध्या लागू असलेल्या शून्य टक्के रस्ते करसवलतीचा आढावा घेताना सर्व प्रस्थापित धोरणे, कायदेशीर तरतुदी आणि देशाचे व्यापक हित लक्षात घेण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या आहेत. मात्र, टेस्लाची सवलत तातडीने रद्द करण्याची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार हरित वाहतूक, ई-बसेसचा विस्तार आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारून पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे.

हेही वाचा – बापरे! ऐकावं ते नवलंच, चक्क एका रोबोटने केलं अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन; सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग, रोबोट पोलिसांच्या ताब्यात

‘व्यापार करताना देशाच्या सन्मानाचे भान ठेवावे’; प्रताप सरनाईक यांचा रोखठोक इशारा
पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रीय स्वाभिमान या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारताच्या स्वाभिमानाशी खेळू नये, असे सरनाईक यांनी बजावले आहे. ‘जागतिक कंपन्यांसाठी भारताची दारे कायम उघडी आहेत, परंतु परस्पर आदर आणि विश्वासाशिवाय कोणतेही व्यावसायिक संबंध दीर्घकाळ टिकू शकत नाहीत,’ असे ते म्हणाले. भारताच्या राष्ट्रीय अस्मितेशी तडजोड करून कोणताही नफा किंवा व्यापार स्वीकारला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश राज्य सरकारने दिला आहे.

काही काळापूर्वी नातवाला भेट दिली होती कार; आता घेतला कठोर पवित्रा
विशेष म्हणजे काही काळापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवाला टेस्लाची आलिशान कार भेट दिल्याने मोठी चर्चा रंगली होती. परंतु आता देशाच्या सन्मानाचा प्रश्न उपस्थित होताच त्यांनी टेस्लाच्या करसवलतींविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. हरित प्रवासाचे समर्थन करतानाच राष्ट्रीय स्वाभिमानाला प्राधान्य देणाऱ्या या भूमिकेनंतर आता केंद्र आणि राज्य सरकार टेस्लावर पुढील काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा – ‘लडाख हा आमचाच अविभाज्य भाग’; भारताकडून लडाखच्या 28 सामरिक ठिकाणांची अधिकृत नावे जाहीर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number