जर्मनीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी चक्क एका रोबोटला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जर्मनीच्या कोलोन शहरातील ही घटना असून एका फास्ट-फूड रेस्टॉरंटबाहेर ठेवलेल्या रोबोटने एका 16 वर्षांच्या मुलीसोबत गैरवर्तन केले. या मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिच्या दिशेने आक्षेपार्ह हालचाली केल्याचा आरोप आहे. या घटनेचे दोन तरुणांकडून सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
डेली मेलच्या वृत्तानुसार, ही घटना रविवारी रात्री सुमारे 11.45 वाजता कोलोन शहराच्या मध्यवर्ती भागातील होहेनझोलर्नरिंग या गजबजलेल्या रस्त्यावर घडली. पीडित मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत एका फास्ट-फूड रेस्टॉरंटच्या बाहेर उभी असताना, सुमारे 1.2 मीटर उंचीचा एक लाल-सोनेरी रंगाचा रोबोट कथितरित्या तिच्या पाठीमागून आला. त्याने तिला चुकीचा स्पर्श केला आणि तिच्या दिशेने आक्षेपार्ह हालचाली करण्यास सुरुवात केली.
दोन किशोरवयीन मुलांनी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले, तसेच पोलिसांनी दोन किशोरवयीन मुलांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. अधिकाऱ्यांनी मॅग्नसस्ट्रासे आणि होहेनझोलर्नरिंगच्या छेदनबिंदू जवळ संशयितांना शोधून काढले. तिथं एका फॉक्सवॅगन कारच्या डिकीमध्ये हा रोबोट लपवून ठेवलेला आढळला. तपासाचा भाग म्हणून अधिकाऱ्यांनी तो रोबोट आणि संशयितांचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर, पाहा जय महाराष्ट्र न्यूज