सांगली: धर्मांतरासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून सात महिन्याच्या गर्भवती विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीतील कुपवाड येथे घडली आहे. ऋतुजा सुकुमार राजगे (वय 27) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, तिच्या सासरच्यांकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात होते, असा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
ही घटना 6 जून रोजी ऋतुजाच्या सासरच्या घरी घडली. ऋतुजा ही सात महिन्यांची गर्भवती असूनही मानसिक आणि धार्मिक छळ सहन करत होती. अखेर या छळाला कंटाळून तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिचा पती सुकुमार राजगे, सासरे सुरेश राजगे आणि सासू अलका राजगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे.
हेही वाचा: 'मुख्यमंत्री हा कुणाचाही बाप नसतो, तो जनतेचा...'; नितेश राणेंच्या वक्तव्यावर वडिलांचा संताप
मृत ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील (रा. गुंडेवाडी, मिरज) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ऋतुजावर विवाहानंतर वारंवार ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. नकार दिल्यानंतर तिच्यावर मानसिक त्रास आणि छळ सुरु झाला. तिच्या गरोदरपणातही हा छळ थांबला नाही. एकीकडे आई होण्याचे स्वप्न आणि दुसरीकडे सासरच्यांचा मानसिक छळ, यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
वैशाली हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात खळबळ माजलेली असतानाच, सांगलीत घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा धर्मांतराच्या नावाखाली होणाऱ्या छळाची गंभीरता समोर आणली आहे. सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, पीडितेला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला जात आहे.
हेही वाचा: शनिशिंगणापूर देवस्थानात मुस्लिम कर्मचारी वाद; 14 जूनला सकल हिंदू समाजाचा आंदोलनाचा इशारा
पोलीस निरीक्षकांच्या माहितीनुसार, आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिक गतीने सुरू असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.