Thursday, November 13, 2025 08:33:53 AM

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर पुन्हा संतापले; जैन बोर्डिंग वादाप्रकरणी पोलिसांकडे करणार तक्रार दाखल

जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावर रवींद्र धंगेकर यांनी तीव्र भूमिका घेत चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी पोलखोल करण्याची चेतावणी देत धर्मादाय आयुक्त आणि बिल्डर्सच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

ravindra dhangekar  रवींद्र धंगेकर पुन्हा संतापले जैन बोर्डिंग वादाप्रकरणी पोलिसांकडे करणार तक्रार दाखल

पुणे : शहरातील प्रसिद्ध जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहार प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी मोठा सूर आळवला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करत धंगेकर यांनी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्याची घोषणा केली आहे.

धंगेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहारातून गोखले बिल्डर्सनी माघार घेतली असली, तरी एवढ्या मोठ्या जमिनीचा व्यवहार कोणी आणि कसा केला, याची चौकशी झालीच पाहिजे.” त्यांनी धर्मादाय आयुक्त आणि संबंधित बिल्डर-राजकारण्यांतील संबंधांवरही प्रश्न उपस्थित केला.

ते म्हणाले, “धर्मादाय आयुक्तालयात अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे रखडून राहतात, पण या वेळी एवढा जलद निर्णय कसा घेतला गेला? यामागे कोणाचा हात आहे?" असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केला.

धंगेकर म्हणाले, “मी पोलीस ठाण्यात जी तक्रार दाखल करणार आहे, त्यात कोणाचंही नाव लिहिणार नाही. पण या व्यवहारात कोण कोण सामील आहे, हे जाणून घ्यायचं असेल, तर गोखले बिल्डर्सना विचारावं.” त्यांनी धर्मादाय आयुक्तांच्या भूमिकेवरही शंका व्यक्त करत म्हटलं की, “याआधी इतक्या वेगाने निर्णय कधी दिला गेला नाही. "

हेही वाचा: Thane Metro: ठाणेकरांसाठी गूड न्यूज! नोव्हेंबरपासून सुरू होणार 29 किमी लांबीची रिंग मेट्रो, 22 स्थानकं जोडणार ठाण्यातील महत्त्वाचे भाग

यावेळी त्यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दलही चिंता व्यक्त केली. “शिंदे साहेबांनी थोडं थांबायला सांगितलं आहे, पण पोलखोल तर करणारच. मी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदर करतो असेही ते म्हणाले. पुण्यात सध्या 70 टोळ्या कार्यरत आहेत. हा विषय केवळ शिंदे किंवा फडणवीस यांचा नाही, तर पुण्याच्या सुरक्षेशी संबंधित आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत त्यांनी राजकारणातील विरोधकांवरही निशाणा साधला. “आजपर्यंत मला राजकारणात मर्द भेटला नाही. काही दिवसांनी सगळ्यांची औकात दाखवतो,” असे वक्तव्य करत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. “मी कोणाच्या कुटुंबावर जात नाही, कारण मला संस्कार मिळाले आहेत. सत्ता जनतेसाठी असते, घरासाठी नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

धंगेकर यांच्या वक्तव्यांमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात आणि सामाजिक क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे. जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराच्या चौकशीची मागणी आणि वाढत्या गुन्हेगारीवर त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया या दोन्हीमुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे. 

हेही वाचा: Pune University Flyover: युनिव्हर्सिटी चौकातील उड्डाणपूल प्रकल्प पूर्णतेकडे; प्रवाशांना मिळणार दिलासा


सम्बन्धित सामग्री