Sunday, November 16, 2025 11:49:27 PM

Thane Metro: ठाणेकरांसाठी गूड न्यूज! नोव्हेंबरपासून सुरू होणार 29 किमी लांबीची रिंग मेट्रो, 22 स्थानकं जोडणार ठाण्यातील महत्त्वाचे भाग

ठाणेकरांसाठी मोठी बातमी! नोव्हेंबरपासून ठाण्यात 29 किमी लांबीच्या अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. 22 स्थानकांसह हा प्रकल्प प्रवाशांना मोठा दिलासा देणार आहे.

thane metro ठाणेकरांसाठी गूड न्यूज नोव्हेंबरपासून सुरू होणार 29 किमी लांबीची रिंग मेट्रो 22 स्थानकं जोडणार ठाण्यातील महत्त्वाचे भाग

Thane Metro: ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या सोयींच्या दृष्टीने मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे शहरात अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली असून या प्रकल्पाचं काम नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 29 किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गामुळे ठाणेकरांचा प्रवास आता केवळ जलदच नव्हे तर अधिक सोयीस्कर होणार आहे.

या रिंग मेट्रो मार्गावर एकूण 22 स्थानकं असणार आहेत, त्यापैकी 20 एलिवेटेड (उन्नत) आणि 2 अंडरग्राऊंड (भूमिगत) असतील. ही दोन भूमिगत स्थानकं ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे येथे असतील. हा कॉरिडॉर शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या भागांना एकत्र जोडेल वागळे इस्टेट, मानपाडा, बाळकुम, राबोडी, आणि ठाणे जंक्शन या ठिकाणांचा यात समावेश आहे.

हेही वाचा: Pune University Flyover: युनिव्हर्सिटी चौकातील उड्डाणपूल प्रकल्प पूर्णतेकडे; प्रवाशांना मिळणार दिलासा

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाण्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच, कामकाजाच्या वेळेत ठाण्याच्या वेगवेगळ्या भागांमधील प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. सध्या ठाणेकरांना रोजच्या प्रवासात मोठ्या प्रमाणात वेळ आणि उर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे ही मेट्रो सेवा ठाणेकरांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे.

या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, सुमारे 12,200 कोटी खर्च अपेक्षित आहे. महा मेट्रो (Maha Metro) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार असून, या मार्गाचे नियोजन उल्हास नदीपासून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरापर्यंत करण्यात आले आहे.

शहरात वाढत्या लोकसंख्येला आणि वाढत्या वाहनवाहतुकीला पाहता पर्यावरणपूरक वाहतूक पर्यायाची गरज भासत होती. या पार्श्वभूमीवर ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो हा प्रकल्प शहराच्या भविष्यातील वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही मेट्रो सेवा 2029 पर्यंत सुरू होईल आणि रोज अंदाजे 6.47 लाख प्रवाशांना ती सेवा देईल. त्यामुळे ठाणेकरांच्या दैनंदिन प्रवासात केवळ सोयच नव्हे, तर वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे.

हेही वाचा: State Election Commission: मतदार यादीतील दुबार नावे तपासणार राज्य निवडणूक आयोग, पारदर्शक निवडणुकांसाठी मोहीम सुरू

ठाणे रिंग मेट्रोच्या मार्गात असणारी काही महत्त्वाची स्थानकं अशी; ठाणे जंक्शन, वागळे सर्कल, गांधी नगर, नीळकंठ टर्मिनल, मानपाडा, विजय नगरी, वाघबिळ, मनोरमानगर, पाटीलपाडा, बाळकुम नाका आणि कोलशेत इंडस्ट्रिअल एरिया.

या प्रकल्पामुळे ठाणे शहराला नव्या वाहतूक युगाची दिशा मिळणार आहे. आगामी काही वर्षांत ठाणेकरांचा प्रवास फक्त जलदच नव्हे, तर अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल.


सम्बन्धित सामग्री