पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने पाणी बचतीसाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर २०२६ पासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे या माहितीत नमूद करण्यात आले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून तो दीर्घकाळ पुरवण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
धरणांतील पाणीसाठ्याबाबत चिंता
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला आहे. १२ ऑक्टोबरअखेर या धरणसाखळीत २६.२२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत हा साठा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
खडकवासला धरणसाखळीबरोबरच भामा आसखेड आणि पवना धरणांमधील उपलब्ध पाण्याचाही आढावा घेण्यात आला आहे. अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाण्याचा वापर मर्यादित ठेवण्यावर भर दिला जात आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार, १६ ऑक्टोबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी वापरात किमान १० टक्के कपात करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. उपलब्ध जलसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवण्यासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.
बांधकाम आणि वाहन धुलाईसाठी पिण्याचे पाणी वापरू नका
पाणी बचतीसाठी महापालिकेकडून नागरिकांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेले सांडपाणी, बोअरवेल किंवा विहिरीतील पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक आणि खासगी वाहन धुलाई केंद्रांनी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
उद्यानांना पाणी देण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. खासगी तसेच सार्वजनिक जलतरण तलावांसाठीही पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करण्याची सूचना आहे. सोसायट्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) कार्यान्वित ठेवून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा बागकाम आणि फ्लशिंगसाठी पुनर्वापर करावा.
पुणेकरांनी पाणी कसे वाचवावे?
घरातील नळ, फ्लश टाक्या आणि पाइपलाइनमधील गळती तातडीने दुरुस्त करावी. आंघोळ, भांडी आणि कपडे धुण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरावे. पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर पाणी वाहून जाणार नाही, याचीही काळजी घ्यावी. हॉटेल, रेस्टॉरंट, वसतिगृहे आणि व्यापारी आस्थापनांनी पाणी बचतीसाठी विशेष उपाययोजना कराव्यात.
सार्वजनिक ठिकाणी पाणीगळती किंवा फुटलेली जलवाहिनी आढळल्यास महापालिकेला कळवावे. अनधिकृत नळजोड आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींसाठी नागरिक PMC Care किंवा महापालिकेच्या कॉल सेंटरशी संपर्क साधू शकतात.