Friday, March 13, 2026 11:27:42 PM

Raj And Aditya Thackeray: शिवाजी पार्कवर काका-पुतण्या एकत्र; राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना केलं वंदन

मुंबईतील शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र येत अभिवादन केले.

raj and aditya thackeray शिवाजी पार्कवर काका-पुतण्या एकत्र राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना केलं वंदन

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्सवाचे वातावरण असताना शिवनेरी गडावर शासकीय पद्धतीने मुख्य सोहळा नुकताच पार पडला. त्यानंतर मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरातही शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यासंदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी दिली आहे.

शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दोन्ही नेत्यांनी वंदन केले. यानंतर परिसरातील सुशोभीकरणासंदर्भातील विविध विकासकामांच्या कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली.

शिवाजी पार्क परिसर अधिक आकर्षक आणि ऐतिहासिक वारशाला साजेसा करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात येणाऱ्या कामांचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

हेही वाचा: Shivneri Fort Stampede : शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाला गालबोट; चेंगराचेंगरीत अनेक शिवभक्त जखमी

दरम्यान, कालच राज ठाकरे यांनी ‘नंदनवन’ या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर आज शिवजयंतीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र दिसल्याने राजकीय चर्चांना नव्याने वेग मिळाला आहे. आगामी राजकीय समीकरणांच्या शक्यतांबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क परिसरातील सुशोभीकरण प्रकल्पासाठी उपस्थित राहून भूमिपूजन सोहळा पार पाडला. शिवजयंतीच्या निमित्ताने इतिहासाला अभिवादन करत विकासकामांचा शुभारंभ करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राज्यभरात आज शिवरायांच्या स्मरणाने प्रेरित वातावरण निर्माण झाले असून, विविध ठिकाणी सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे.

हेही वाचा: Rajya Sabha Election: 'आमचं संख्याबळ जास्त, मग जागाही...'; राज्यसभेच्या जागेसासाठी आदित्य ठाकरेंचा दावा


सम्बन्धित सामग्री