मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी एक घटना गुरुवारी (12 जून) सकाळी घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईतील वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेली गुप्त भेट सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यातील संभाव्य युतीबाबत जोरदार चर्चा सुरु होत्या. दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार अशी राजकीय पार्श्वभूमी तयार होत असताना, राज ठाकरे आणि फडणवीस यांची अचानक भेट हीच चर्चा मोडीत काढणारी ठरली आहे.
विशेष बाब म्हणजे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अधिकृत शासकीय दौऱ्यात या हॉटेलचा कोणताही उल्लेख नव्हता. त्यांचं अचानक त्या ठिकाणी पोहोचणं, आणि राज ठाकरे यांच्यासोबत गुप्त बैठक घेणं, हे ‘फक्त योगायोग’ मानणं कठीण आहे. त्यामुळे या भेटीमागे भाजपची नव्या राजकीय समीकरणांची रणनीती लपलेली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे. 'ठाकरे बंधू एकत्र येणार असं वातावरण तयार झालं होतं. अशा वेळी जर राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटत असतील, तर वाटाघाटीचं हेच वातावरण तर मुद्दाम तयार केलं नव्हतं ना? असा रोहित पवारांचा टोला आहे. ते पुढे म्हणाले की, 'जर हे खरे असेल, तर सामान्य जनतेसमोर राज ठाकरे यांची विश्वासार्हता धोक्यात येईल.'
ही भेट केवळ एक औपचारिक शिष्टाचार नव्हती, याचे संकेत अनेक राजकीय हालचालींमधून मिळत आहेत. भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला जवळ खेचण्यासाठी हा डाव आखलेला असावा, असा कयास आहे. यामुळे शिवसेना (उबाठा) - मनसे युतीची शक्यता आता धुसर झाली आहे.
गेल्या काही महिन्यांत राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधात सौहार्द वाढले होते. एकत्र येऊन भाजपविरोधात संयुक्त लढा उभा करण्याच्या शक्यता उभ्या राहत होत्या. मात्र, राज ठाकरे यांनी अशा संवेदनशील क्षणी फडणवीस यांच्याशी गुप्त चर्चा केल्यामुळे, ‘मनसे पुन्हा भाजपच्या जवळ जातेय का?’ हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
हेही वाचा: मांजरांचा वाद पोहचला थेट पोलीस स्टेशनपर्यंत; कोल्हापुरात बेकायदेशीर प्राणीपालनावर कारवाई
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील राजकारणातील कुशल रणनीतीकार मानले जातात. योग्य वेळ साधून त्यांनी राज ठाकरे यांना भेटून, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकंदरीत, फडणवीस-राज ठाकरे यांच्यातील ही गुप्त भेट महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवून आणू शकते. मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांपूर्वी ही भेट नेमकी कोणत्या हेतूने झाली, हे पुढील काळात स्पष्ट होईल. पण सध्या तरी या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना नवा उधाण आलाय.