Sunday, July 13, 2025 10:42:52 AM

Indrayani River Bridge Collapse: 'सत्तेचा उपयोग नेमका कशासाठी?', इंद्रायणी दुर्घटनेवर राज ठाकरेंचा सवाल

मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना, राज ठाकरेंकडून सरकारवर टीका, नियोजनशून्यता आणि जबाबदारीच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित.

indrayani river bridge collapse सत्तेचा उपयोग नेमका कशासाठी इंद्रायणी दुर्घटनेवर राज ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्र: राज्यात पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली असताना पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवर असलेला जुना लोखंडी पूल कोसळला आणि या दुर्घटनेत अनेक जण वाहून गेलेत, काही जण मृत्युमुखी पडलेत. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करून या दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त केला आहे आणि सरकारवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राज ठाकरेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, 'जर पूल धोकादायक होता तर तिथे पूर्णपणे प्रवेशबंदी का झाली नाही?' तसेच, 'हा पूल जर वापरण्यायोग्य नव्हता तर तो पाडून नव्याने पूल का उभारला गेला नाही?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरवर्षी अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात, मात्र त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना का केली जात नाही, यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.

हेही वाचा:छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा अजब निर्णय; जन्म प्रमाणपत्रासाठी करपावती अनिवार्य

राज ठाकरे म्हणाले की, प्रत्येक घटनेनंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया असते की, 'बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.' पण हा प्रसंग मुळात येतो तरी का? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या दुर्घटनेच्या निमित्ताने त्यांनी प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर बोट ठेवत विचारले की, 'पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, याची तपासणी करून दुरुस्ती किंवा बंद करण्याचं नियोजन का केलं जात नाही?' प्रशासन जर ही कामं करत नसेल, तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांनी स्वतःहून पुढाकार घेत प्रशासनाकडून काम करून घ्यायला हवं होतं. जर हे शक्य नसेल तर सत्तेचा अनुभव नेमका कशासाठी? आणि त्याचा राज्याला काय उपयोग?

हेही वाचा: सुधाकर बडगुजर भाजप प्रवेशासाठी सज्ज; स्थानिक भाजप नेत्यांची नाराजी कायम

यासोबतच राज ठाकरे यांनी नागरिकांनाही एक मोलाचा सल्ला दिला. त्यांनी म्हटलं की, 'लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं.' मात्र याचा अर्थ सरकारची जबाबदारी कमी होते, असं मुळीच नाही. सरकार जर निष्काळजीपणा दाखवत असेल तर नागरिकांनी स्वतः सतर्क राहावं, असं त्यांनी सांगितलं.

पावसाळ्याला सुरुवात होताच राज्यातील अनेक शहरांत पूर, पाणी साचणं, रस्त्यांची दुरवस्था आणि पूल कोसळण्याच्या घटना घडू लागल्यात. अशा परिस्थितीत सरकारने युद्धपातळीवर काम करावं, जेणेकरून नागरिकांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.


सम्बन्धित सामग्री