Thursday, July 17, 2025 02:41:41 AM

सुधाकर बडगुजर भाजप प्रवेशासाठी सज्ज; स्थानिक भाजप नेत्यांची नाराजी कायम

सुधाकर बडगुजर व गणेश गीते भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत; स्थानिक पातळीवर विरोध असतानाही वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय; आमदार सीमा हिरे यांचा सोशल मीडियावरून स्पष्ट विरोध.

सुधाकर बडगुजर भाजप प्रवेशासाठी सज्ज स्थानिक भाजप नेत्यांची नाराजी कायम

महाराष्ट्र: माजी उपनेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगली आहे. उद्या मुंबईत त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला असल्याची जोरदार चर्चा असून, यावेळी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुधाकर बडगुजर यांच्यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढविलेले गणेश गीते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर या प्रवेशाला काही पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध असूनही, वरिष्ठ पातळीवरून या दोघांनाही पक्षप्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

हेही वाचा:महसूल प्रशासनातील लाचखोरीची मालिका; महिनाभरात पाच अधिकाऱ्यांवर कारवाई

वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका स्पष्ट आहे 'आपल्याकडे पक्ष प्रवेश न दिल्यास हे नेते इतर पक्षात जाण्याची शक्यता असल्याने त्यांना प्रवेश देणे हेच योग्य ठरेल.' त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध जुगारून सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला जात आहे.

दरम्यान, या प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे. माध्यमांसमोर त्यांनी कोणतीही भूमिका मांडण्यास नकार दिला असला तरी, त्यांचा विरोध सोशल मीडियावर जोरदारपणे दिसून आला आहे. त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध कायम असल्याचे संकेत दिले आहेत. 'सोशल मीडियावर पक्षप्रवेशाचा विरोध मावळलेला नाही,' असा मजकूरही त्यांनी पोस्ट केला आहे.

हेही वाचा:छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा अजब निर्णय; जन्म प्रमाणपत्रासाठी करपावती अनिवार्य

सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश हा फक्त एका नेत्याचा पक्षांतर नसून, स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम घडवणारा निर्णय ठरू शकतो. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर सत्तासंघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. याआधीही भाजपमध्ये अशा प्रकारचे पक्षप्रवेश झाले असून, त्यावेळीही स्थानिक नेत्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले होते.

आता सर्वांचे लक्ष उद्याच्या पक्षप्रवेशाकडे लागले असून, बडगुजर यांचा शक्तीप्रदर्शनाचा थाट, तसेच विरोध कितपत उफाळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री