मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये पहिलीपासून फक्त मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा शिकवल्या जाव्यात अशी मागणी केली आहे. ठाकरे यांनी आपल्या पत्रात राज्य सरकारच्या अलिकडच्या घोषणेचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये पहिलीपासून तीन भाषांचा समावेश करण्याचा प्रस्ताव होता, ज्यामध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य आहे. तथापि, लोकांच्या टीकेनंतर आणि निषेधानंतर सरकारने नंतर स्पष्ट केले की, हिंदी भाषा सक्तीची असणार नाही.
हेही वाचा - मलिन प्रतिमा असलेल्या व्यक्तींना पक्षात स्थान मिळणे योग्य नाही; बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध
राज ठाकरे यांचे दादा भुसे यांना पत्र -
दरम्यान, यावर राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, सरकारच्या स्पष्टीकरणानंतर कोणताही औपचारिक सरकारी ठराव किंवा लेखी सूचना जारी करण्यात आल्या नाहीत, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. आता पुस्तकं छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावर घुमजाव करायचं असं काही करण्याचा सरकारचा काही डाव तर नाही ना ? असं काही नसेल असं मी गृहीत धरतो, पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात सरकारला दिला आहे.
हेही वाचा - सोलापुरात गर्भवती महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
सरकारने लेखी आदेश जारी करावा -
दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात शिक्षण विभागाला एक स्पष्ट आणि अधिकृत लेखी आदेश जारी करण्याचे आवाहन केले आहे. शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील (मराठी आणि इंग्रजी) या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा, अशी मागणी केली आहे.