नाशिक: भाजपच्या नाशिकमधील आमदार सीमा हिरे यांनी माजी आमदार सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत थेट विरोध दर्शवला आहे. 'सुधाकर बडगुजर यांच्यावर तब्बल 17 गुन्हे दाखल असून, ते गुन्हे लपवण्यासाठीच भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
सीमा हिरे म्हणाल्या की, 'प्रेसच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. मला त्यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही आधीपासून माहिती नव्हती. आजच प्रथमच ही गोष्ट समजली आहे. 2014 आणि 2024 मध्ये मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. त्यांनी निवडणूक काळात आमच्या कार्यकर्त्यांना धमकावले होते.'
हेही वाचा: 'आरोपीकडून तब्बल 300 कोटी मागितले, हे अधिकारी फॉल्टी...' आमदार सुरेश धस यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप
त्यानंतर त्यांनी बडगुजर यांच्यावरील आरोपांची यादीच मांडली. 'त्यांच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या मुलाने एका व्यक्तीवर गोळीबार केला आहे. बडगुजर हे महापालिकेतील टेंडर प्रक्रियेत सहभागी असून, आर्थिक व्यवहारही करतात. त्यांनी अनेक वेळा पक्षाच्या प्रतिमेला धक्का दिला आहे. त्यामुळेच त्यांच्या पक्षप्रवेशाला मी आणि अनेक कार्यकर्ते ठाम विरोध करत आहोत,' असं हिरे यांनी स्पष्ट सांगितलं.
तसेच, त्यांनी पुढे म्हटले, 'पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना अडचणीत आणणाऱ्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांनी बावनकुळे साहेबांच्या कसिनो प्रकरणाचे फोटो प्रसिद्ध केले. नारायण राणे यांना भरल्या ताटावरून अटक झाली, त्याचे पडसाद उमटले. ‘सलीम कुत्रा’ प्रकारही त्यांच्या कार्यकाळात समोर आला. ही सगळी उदाहरणं त्यांच्या राजकीय शैलीचं दर्शन घडवतात.'
हिरेंनी स्पष्ट केले की, 'आमच्या पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळतो. आम्ही लोकशाही मार्गाने निर्णय घेतो. मलिन प्रतिमा असलेल्या व्यक्तींना पक्षात स्थान मिळणे हे योग्य नाही. बडगुजर यांचा प्रवेश झाल्यास पक्षाची प्रतिमा खराब होईल आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होईल.'
हेही वाचा: 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याच्या बातमीत अर्धसत्य; चित्रा वाघ यांचा खुलासा
त्या पुढे म्हणाल्या,'बडगुजर यांना पक्षात कोणतेही अधिकृत पद दिले गेलेले नाही. तरीही त्यांचे नाव सतत पुढे येते. पेपरमध्ये वाचून सामान्य लोकदेखील मला फोन करून विचारत आहेत. यावरून जनतेचा प्रतिसाद लक्षात यावा. इतर कुणाचे नाव पुढे आलेले नाही, केवळ बडगुजर यांचंच नाव पुढे येत आहे, यावरून अनेक शंका उपस्थित होतात.'
सीमा हिरे यांनी पक्षश्रेष्ठींना इशाराही दिला की, 'पक्षातील निर्णय वरिष्ठ घेतात, हे मान्य आहे. पण कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अशा लोकांचा प्रवेश झाल्यास आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही जनतेसमोर कोणता चेहरा घेऊन जाऊ?'
त्यांनी ठामपणे सांगितलं, 'बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्यास आमचा पूर्ण विरोध आहे. त्यांनी पूर्वी अनेक गुन्हे केले आहेत, तसेच निवडणुकीदरम्यान आमच्या नेत्यांविरोधात खालच्या थराला जाऊन प्रचार केला आहे. त्यांना भाजपमध्ये येऊन स्वतःला ‘पवित्र’ दाखवायचं आहे, पण पक्षाची प्रतिष्ठा यामुळे धोक्यात येईल.'