पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पणे अन् पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये ऑनलाइन बाइक-टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोणतीही कायदेशीर किंवा शासनमान्य परवानगी न घेताच शहरात प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप करत रिक्षा संघटनांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी या बेकायदेशीर सेवेवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी केली होती. या प्रकरणी प्रशासकीय पातळीवर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत रॅपिडोची बाइक-टॅक्सी सेवा बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने वाहन चालकांच्या वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
पारंपरिक रिक्षा-टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम
दरम्यान, रॅपिडोच्या सेवेमुळे शहरातील पारंपरिक रिक्षा आणि चारचाकी टॅक्सी चालकांच्या रोजगारावर आणि उत्पन्नावर अत्यंत विपरीत परिणाम होत होता. या आर्थिक समस्येविरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया तसेच संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे अधिकृत निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर आणि अधिकृत परवान्यांच्या वैधतेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव आणि वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान डॉ. बाबा कांबळे यांनी केवळ तोंडी निर्देश न देता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाच्या या निर्देशांची प्रत्यक्षात कशी अंमलबजावणी केली जाते आणि रॅपिडो कंपनी यावर काय भूमिका घेते, याकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य प्रवाशांसह रिक्षा-टॅक्सी चालकांचे लागून राहिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.