तुळजाभवनी मातेचं दर्शन अवघ्या काही तासांवर आलं होतं. मात्र, मंदिरापर्यंत पोहोचण्याआधीच भाविकांवर काळाने घाला घातला. या भीषण घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घडलं नेमकं काय?
मुंबई-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग बायपासजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला होता. कर्नाटकातील बसवकल्याण येथून तुळजाभवनी मातेच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या काही भाविकांच्या समूहाला पाठीमागून आलेल्या एका भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहे.
हेही वाचा- नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; नाशिकमध्ये हळहळ
मिळालेल्या माहितीनुसार, बसवकल्याण येथून भाविकांचा ग्रुप हा तुळजापूरच्या दिशेने पायी जात होता. याच दरम्यान हैदराबादहून मुंबईकडे जाणारा कंटेनर नळदुर्ग बायपासजवळ आला. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने भाविकांना धडक दिली. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या भीषण अपघातात गुरुसिद्ध बाबुराव कुंभार(वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर जखमींना पोलिसांच्या मदतीने तातडीने नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी तसेच पायी जाणाऱ्या भाविकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.