नाशिक: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येणार का, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीबाबत नेहमीच उलटसुलट चर्चा होत असतात. मात्र, यावेळी या चर्चेला बळकटी मिळाली आहे ती खासदार संजय राऊत यांच्या सूचक वक्तव्यामुळे.
नाशिकमध्ये नुकतेच ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले, 'नेत्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संवाद आणि एकोपा वाढला आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यांचे सहकारी आणि आमच्याही बाजूने सकारात्मक विचार सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जवळीक निर्माण झाली असेल, तर त्यात आश्चर्य कशाचे?'
हेही वाचा: 'शिंदे गटात जाणं ही माझी चूक होती'; ठाकरे गटात परतलेल्या सुजाता शिंगाडेंचा गौप्यस्फोट
संजय राऊत यांचे हे सूचक विधान म्हणजे एक नवा राजकीय संकेत असल्याची चर्चा आता रंगत आहे. राऊत पुढे म्हणाले की, 'फळ मिळण्यासाठी आधी बी पेरावं लागतं, पाणी द्यावं लागतं, रोप वाढवावं लागतं. ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. लवकरच फळं लागलेली दिसतील.' त्यांच्या या विधानावरून राज-उद्धव युतीचे बीज पेरले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
दरम्यान, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही यावर थेट प्रतिक्रिया दिली होती. 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत. त्यांना युती करायची असेल, तर त्यांनी एकमेकांना फोन करावा. आमचं बोलून काही फरक पडणार नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी त्यांनी हेही सूचित केलं की, 'कदाचित फोन झाले असतीलही.'
संजय राऊत यांना विचारले असता त्यांनीही ही शक्यता नाकारली नाही. उलट त्यांनी म्हटले की, 'दहा मिनिटांनी फोन करतो असं सोशल मीडियावर सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात फोन होतात का? हे दोघे एकमेकांना चांगले ओळखतात, त्यामुळे पडद्यामागे संवाद झाला असेल तर नवल नाही.'
हेही वाचा: जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी भडगाव मायंबा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय
या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी संजय राऊत यांना 'शिवतीर्थ कॅफे'ला भेट देण्याचे आमंत्रण दिले होते. यावर राऊत म्हणाले, 'अमित फार गोड मुलगा आहे. आदित्यसारखाच समजूतदार. त्याच्या भावना आणि भूमिका मला भावल्या. शिवतीर्थ कॅफे आमच्यासाठी केवळ कॅफे नाही, तर दुसरं घर आहे.'
राजकीयदृष्ट्या वेगाने बदलत चाललेले समीकरण पाहता, उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? हा प्रश्न आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकच महत्त्वाचा ठरतोय. सध्या तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.