छत्रपती संभाजीनगर : एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा बदल होणार आहे. या पुढे शासकीय सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असणं बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने याबाबतचा अंतिम निर्णय घेतला असून 1 ऑक्टोबरपासून ही नियामवली लागू होईल.
गेल्या 3 महिन्यांपासून महामंडळाकडून प्रवाशांना स्मार्ट कार्ड काढण्याचे आवाहन केले जात आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत सुमारे 2 लाख प्रवाशांनी हे कार्ड काढले आहे. यापूर्वी 1 सप्टेंबरपासून ही सक्ती लागू करण्याचा निर्णय होता. मात्र, काही प्रवाशांचा गोंधळ आणि तांत्रिक बिघाडामुळे दोन वेळा ही मुदतवाढ द्यावी लागली.
नेमकी अडचण काय आहे?
खरं तर स्मार्ट कार्डची संपूर्ण प्रक्रिया ही नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या सर्व्हरशी जोडली गेली आहे. हे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने कार्ड काढल्यावरही रिचार्ज आणि अॅक्टिव्हेशन होत नाही, त्यामुळे अनेक प्रवाशांना बसस्थानकावर किंवा थेट बसमधील वाहकाकडे जाऊन कार्ड हे रिजार्च करुन घ्यावे लागत आहे. त्यामुळे बसमध्येही खोळंबा होत आहे.
राज्य सरकारने महिला प्रवाशांसाठी एसटी तिकीटात 50 टक्के सवलत जाहीर केल्यावर महिला प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वर्षातून साधारण एक-दोनदाच प्रवास करणाऱ्या महिलांनाही आता 150 ते 200 रुपये खर्च करुन हे स्मार्ट कार्ड काढावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याआधी महामंडळाने 1 सप्टेंबरपासून सक्तीचे परिपत्क काढले होते. गोंधळ वाढत गेल्याने 14 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली, नंतर पुन्हा ती मुदत वाढवली. मात्र, कोणत्याही प्रवाशाला मुदतवाढ मिळणार नाही. 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड हे सक्तीचे असेल. हे स्मार्ट कार्ड तुमच्या जवळच्या आगारात जाणून काढता येते.