Wednesday, February 18, 2026 05:16:09 PM

Sanjay Raut: "दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार", संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर खोचक टीका केली.

sanjay raut quotदोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणारquot संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात 31 जानेवारी रोजी एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या ऐतिहासिक घटनेवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत मर्मभेदी भाष्य केले आहे. "सुनेत्राताई राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत" असे म्हणत राऊतांनी त्यांच्या पदाचे गांभीर्य अधोरेखित केले. विशेष म्हणजे, या नियुक्तीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता 'घराणेशाही'च्या आरोपातून 'मोक्ष' मिळाला असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान मोदींनी आजवर सातत्याने ठाकरे आणि पवार कुटुंबावर घराणेशाहीचे आरोप केले होते. मात्र, सुनेत्रा पवारांच्या निवडीनंतर मोदींनी त्यांचे अभिनंदन केल्याने आता भाजपचा 'परिवारवादा'चा मुद्दा निकालात निघाला असल्याचे राऊत म्हणाले. "ज्या घराणेशाहीवर मोदींनी टीका केली, आज त्याच परंपरेचे त्यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे भाजप आता इतरांवर घराणेशाहीचे आरोप करणार नाही, अशी अपेक्षा आहे. मोदींच्या या कृतीमुळे त्यांना राजकीय पापांतून मुक्ती मिळाली असून, ते आता खऱ्या अर्थाने मोक्षप्राप्तीकडे वळले आहेत," असा टोला राऊतांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत सत्तासंघर्षावर भाष्य करताना राऊत यांनी पक्षाच्या अस्मितेचा मुद्दा उचलून धरला. "अजित दादांचा पक्ष हा रांगड्या माणसांचा, कष्टकऱ्यांचा आणि भोसले-पाटलांचा पक्ष आहे. तो पटेलांचा होऊ नये," असा इशारा त्यांनी दिला. शरद पवारांच्या 'राजकीय दुर्बिणी'चा हवाला देत त्यांनी सुचवले की, हा निर्णय कदाचित सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांचा असू शकतो. मात्र, पक्षाची सूत्रे मोहिते किंवा कांबळे यांच्याकडे राहावीत, ती पटेलांच्या हाती जाऊ नयेत, याची काळजी सुनेत्रा पवारांनीच घ्यायला हवी, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा: Devendra Fadanvis : मैत्रीची परिभाषाच वेगळी! अजित पवारांच्या निधनानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय

सर्वात खळबळजनक दावा करताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब केले. "दोन्ही पक्ष एकत्र येणार हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. अजित पवारांच्या मनात शरद पवारांबद्दल शेवटपर्यंत आस्था आणि ओलावा होता. जे काही घडले ते चुकीचे होते, याची जाणीव त्यांना होती," असे राऊत म्हणाले. दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊ नयेत, यासाठीच काही शक्तींनी ही घाई केली असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला.

दुसरीकडे, आज  अर्थमंत्री निर्मला सीतारामन नववे पूर्णवेळ बजेट सादर करत आहेत. यावर बोलताना राऊतांनी सामान्यांच्या काळजीत भर घातली. "निवडणुका डोळ्यासमोर नसल्या की सरकार जनतेला पिळून काढते. 'लाडकी बहीण' सारख्या योजनांचा आर्थिक भार सर्वेक्षणात स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सीतारामन यांनी सामान्यांच्या नाकी नऊ आणू नयेत," अशी भीती त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीचा माहोल नसल्याने सरकार आता तिजोरी भरण्यासाठी मध्यमवर्गीयांच्या खिशावर कात्री लावण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. या नव्या राजकीय दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: बळीराजाची चिंता वाढली! जानेवारीनंतर आता फेब्रुवारीतही पावसाचं संकट? जाणून घ्या


सम्बन्धित सामग्री