मुंबई: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या ड्रोन शोदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. या शोमधील नियंत्रण सुटलेले दोन ड्रोन थेट चर्चगेट रेल्वे स्थानकात कोसळले. यातील एका ड्रोनचा फटका बसल्याने प्लॅटफॉर्मवर उभा असलेला प्रवासी जखमी झाला. बुधवारी रात्री सुमारे 8.10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे रेल्वे स्थानकात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
डोक्याला आणि कपाळाला दुखापत
मिळालेल्या माहितीनुसार, वानखेडे स्टेडियमवर एका टेलिकॉम कंपनीकडून ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. याचदरम्यान दोन ड्रोनवरील नियंत्रण सुटले आणि ते चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या दिशेने आले. त्यापैकी एक ड्रोन प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील विरारच्या दिशेकडील टोकावर आदळला. यावेळी 37 वर्षीय हेमंत महोत्सवकर यांना ड्रोनचा फटका बसला. त्यांच्या डोक्याला आणि कपाळाला दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला.
जखमी प्रवाशाला रुग्णालयात हलवले
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशाला प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्टेशन मास्टरने पुढील उपचार आणि आवश्यक कारवाईसाठी जीआरपीला मेमो पाठवला.
दोन्ही ड्रोन पोलिसांच्या ताब्यात
या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी दोन्ही ड्रोन ताब्यात घेतले आहेत. तसेच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रोन शोदरम्यान नेमकी कोणती तांत्रिक चूक झाली? ड्रोनवरील नियंत्रण कसे सुटले? आणि ते थेट रेल्वे स्थानकात कसे पोहोचले? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.