Saturday, March 07, 2026 06:12:12 AM

Navnath Ban: 'उद्धव ठाकरेंचं बेगडी मराठी प्रेम उघड...'; परभणीत ठाकरे गटाकडून मुस्लिम उमेदवाराला महापौरपद दिल्यानंतर नवनाथ बन आक्रमक

या निवडीवर भाजप नेते नवनाथ बन यांनी अत्यंत जहरी शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. &quotनिवडणुका जवळ आल्या की उद्धव ठाकरे मराठी मराठीचा अजेंडा राबवतात आणि मराठीचा झेंडा हाती घेतात.

navnath ban उद्धव ठाकरेंचं बेगडी मराठी प्रेम उघड परभणीत ठाकरे गटाकडून मुस्लिम उमेदवाराला महापौरपद दिल्यानंतर नवनाथ बन आक्रमक

Navnath Ban : परभणी महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर अपेक्षेप्रमाणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सय्यद इकबाल खाजा यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. मात्र, या निवडीनंतर भाजपने ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला असून, परभणीचे राजकारण चांगलेच तापले आहे.

ठाकरे गटाचा मुस्लिम चेहऱ्यावर विश्वास
परभणी महानगरपालिकेत मुस्लिम नगरसेवकांची संख्या मोठी आहे. हेच राजकीय समीकरण लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका मुस्लिम चेहऱ्याला महापौरपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला. सय्यद इकबाल खाजा यांच्या निवडीमुळे ठाकरे गटाने अल्पसंख्याक समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

'मराठीचा अजेंडा फक्त नावापुरता'; नवनाथ बन यांची टीका
या निवडीवर भाजप नेते नवनाथ बन यांनी अत्यंत जहरी शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. "निवडणुका जवळ आल्या की उद्धव ठाकरे मराठी मराठीचा अजेंडा राबवतात आणि मराठीचा झेंडा हाती घेतात. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष संधी देण्याची वेळ येते, तेव्हा त्यांना मराठी माणसाचा विसर पडतो,' अशी टीका बन यांनी केली आहे. परभणीत महापौर करण्याची संधी असताना उद्धव ठाकरेंनी एखाद्या मराठी माणसाला संधी द्यायला हवी होती, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Parbhani Mayor Election: ठाकरेंची सरशी; परभणीत मुस्लिम चेहऱ्याला संधी देत भाजपला केलं चितपट

'औरंगजेबाचा अजेंडा' आणि बेगडी धोरणाचा आरोप
नवनाथ बन यांनी ठाकरे गटाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, "निवडणुकीत मराठी मतदारांच्या जिवावर निवडून यायचे आणि सत्ता मिळाल्यावर मात्र मुस्लिम महापौर द्यायचा, हे उद्धव ठाकरेंचे बेगडी धोरण आहे. औरंगजेबाचा अजेंडा पुढे नेण्याचे काम परभणीमध्ये ठाकरे गट करत आहे." या निवडीमुळे ठाकरे गटाचे मराठी प्रेम किती बेगडी आहे, हे आता परभणीच्या जनतेसमोर उघड झाले असल्याचा दावाही त्यांनी केला.

परभणीच्या राजकारणात नवे वळण
महापौर निवडीनंतर परभणीत सेना विरुद्ध भाजप असा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. एका बाजूला ठाकरे गटाने स्थानिक समीकरणे जुळवत आपला महापौर बसवण्यात यश मिळवले असले, तरी दुसरीकडे भाजपने 'मराठी माणूस विरुद्ध मुस्लिम चेहरा' असा मुद्दा उपस्थित करून ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री