Thursday, November 13, 2025 07:44:29 AM

IT Notice to Vijay Wadettiwar : सरकारकडून सूडाचं राजकारण; आयटी विभागाच्या नोटिसीबाबत विजय वडेट्टीवारांचा आरोप

विजय वडेट्टीवार यांना आयकर नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी याला राजकीय सूडकारवाई म्हटले आहे. ओबीसी आरक्षणासाठीच्या आंदोलनानंतर लगेच कारवाई झाल्याचा आरोप काँग्रेसने केला.

it notice to vijay wadettiwar  सरकारकडून सूडाचं राजकारण आयटी विभागाच्या नोटिसीबाबत विजय वडेट्टीवारांचा आरोप

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली असून, या कारवाईमागे राजकीय सूडाची भावना लपलेली आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकार यंत्रणांचा वापर करत असल्याची टीका त्यांनी केली.

ओबीसी आरक्षणाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी नागपूरमध्ये मोठा जनआंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तात्काळ ही नोटीस आली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. “ओबीसी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी उभे राहिल्यावर आम्हाला लक्ष्य केले जात आहे. पण आम्ही एक पाऊलही मागे हटणार नाही,” असे ते गडचिरोलीतील काँग्रेसच्या कार्यक्रमात म्हणाले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेनेतील महत्त्वाचे नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. गडचिरोली नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश सावकर पोरेड्डीवार, कविता पोरेड्डीवार, विजय गोरडवार, माजी जि.प. सदस्य लालसू पोगती आणि शिवसेनेचे गजानन नईअम यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

हेही वाचा: Bacchu Kadu Protest : सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत बच्चू कडूंचा नागपूरला वेढा; हमीभावासाठी आक्रमक भूमिका

या पक्षप्रवेशाला “गडचिरोलीतील बदलते राजकीय समीकरण” असे संबोधत वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर समाजात भेद निर्माण करण्याचा आरोप केला. “राजकीय स्वार्थासाठी लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. मात्र राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस विभाजनाऐवजी एकतेचा ध्वज उंचावणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी संकटाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. “पूर आणि नैसर्गिक आपत्तीने होरपळलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, पण एलआयसीसारख्या सरकारी संस्थांच्या पैशांचा उपयोग उद्योगपती मित्रांना मदत करण्यासाठी केला जातो,” असा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर केला.

हर्षवर्धन सपकाळ यांनीही वडेट्टीवार यांच्या टीकेला दुजोरा दिला. “महाराष्ट्रातील सध्या सत्तेत असलेल्या नेतृत्वाला आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यापेक्षा उद्योग क्षेत्रात अधिक रस आहे. गडचिरोलीतील जमीन कायदे उद्योगपतींच्या सोयीने बदलले गेले आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

पोरेड्डीवार आणि पोगती यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत होईल आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत काँग्रेस विजयी ठरेल, असा ठाम दावा सपकाळ यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: CNAP Service: अनोळखी कॉलचे टेन्शन जाणार, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले हे निर्देश


सम्बन्धित सामग्री



ताज्या बातम्या




ताज्या बातम्या