Dombivli Water Crisis: एकीकडे 'स्मार्ट सिटी'च्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे डोंबिवलीतील आयरेगाव, टावरी पाडा परिसरातील नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, घरगुती वापरासाठी नागरिकांना चक्क रिक्षातून पाणी वाहून आणावे लागत असून, त्यासाठी दिवसाला 200 रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून 'स्मार्ट सिटी' फक्त कागदावरच आहे का? असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत.
महिला आणि ज्येष्ठांची पाण्यासाठी पायपीट
नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने या परिसरातील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. सकाळी कामावर जाण्यापूर्वी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. अधिकृत इमारतींना पाणी मिळत नसल्याने रहिवाशांना खाजगी रिक्षा किंवा सायकलवरून पाणी विकत आणण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. "गाव-खेड्यापेक्षाही वाईट अवस्था सुशिक्षित डोंबिवलीत झाली आहे," अशी भावना स्थानिक व्यक्त करत आहेत. या समस्येमागे एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. परिसरातील अनधिकृत चाळींना पाणीपुरवठा होत असताना, नियमानुसार कर भरणाऱ्या अधिकृत इमारतींना मात्र कोरड्या नळांचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय नियोजनाच्या या अभावामुळे नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र संताप आहे.
हेही वाचा - BMC Budget 2026: मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या! BMC च्या अर्थसंकल्प कोणत्या विभागाला मिळणार झुकतं माप?
लोकप्रतिनिधींचे काय म्हणणे आहे?
स्थानिक भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी पाणीटंचाईची समस्या मान्य केली असून त्यामागची तांत्रिक कारणे स्पष्ट केली आहेत. 2005 ते 2015 दरम्यान केवळ 1.5 लाख लिटरची टाकी होती, ती आता 15 लाख लिटर क्षमतेची करण्यात आली आहे. 2015 पर्यंत केवळ 250 अधिकृत जोडण्या होत्या, त्या आता 1,650 वर पोहोचल्या आहेत. अडीच कोटींचा नवीन विकास आराखडा तयार असून 6 इंचाची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे पूर्ण होताच 95 टक्के समस्या सुटेल, असा दावा टावरे यांनी केला आहे.