Pune Mhada Lottery: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांसाठी मंगळवारचा दिवस आनंदाचा ठरणार आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या 4,186 सदनिकांची बहुप्रतीक्षित संगणकीय सोडत मंगळवारी (10 फेब्रुवारी 2026) काढली जाणार आहे. हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो अर्जदारांचे लक्ष आता या सोडतीकडे लागले आहे.
सोडतीचा तपशील आणि मान्यवरांची उपस्थिती
घरांच्या निवडीची ही प्रक्रिया मंगळवारी दुपारी 12:00 वाजता पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात पार पडेल. पुणे म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते या सोडतीचे अधिकृत उद्घाटन केले जाईल. पारदर्शकता जपण्यासाठी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल हे मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.
एका घरासाठी 51 दावेदार: अर्जांचा विक्रमी महापूर
यावेळी म्हाडाच्या घरांसाठी अर्जदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. एकूण 4,186 घरांसाठी 2,58,000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी कागदपत्रांची पूर्तता करून आणि अनामत रक्कम भरून 2,15,965 अर्जदार अंतिम स्पर्धेत पात्र ठरले आहेत. सरासरी पाहता, एका घरासाठी साधारणपणे 51 दावेदार रिंगणात आहेत. या सोडतीत प्रामुख्याने 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 3,322 आणि सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 864 घरांचा समावेश आहे.
हेही वाचा - Aqua Line Metro Problems : ॲक्वा लाईनकडे विद्यार्थी का फिरवतायत पाठ? 'ती' समस्या कधी होणार दूर ?
घरबसल्या पाहा निकालाचे 'थेट प्रक्षेपण'
अर्जदारांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी म्हाडाने या सोडतीचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली आहे. अर्जदार म्हाडाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर (https://youtube.com/live/QTmRzDT_NbA) दुपारी 12:00 वाजल्यापासून ही प्रक्रिया लाईव्ह पाहू शकतील. याशिवाय, पात्र अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर निकालाची लिंक एसएमएस (SMS) द्वारे पाठवण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता आणि तांत्रिक कारणांमुळे दोनदा लांबणीवर पडलेली ही सोडत अखेर मार्गी लागत असल्याने अर्जदारांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.