Ratnagiri Bomb Blast: रत्नागिरी हादरलं! जंगलात लाकूड गोळा करताना महिलेच्या हातात गावठी बॉम्बचा स्फोट; परिसरात सापडले 25 जिवंत बॉम्ब

रत्नागिरीतील जांभारी फाटा परिसरात जंगलात लाकूड गोळा करताना महिलेच्या हातात गावठी बॉम्बचा स्फोट झाला.
Ratnagiri Bomb Blast: रत्नागिरी हादरलं! जंगलात लाकूड गोळा करताना महिलेच्या हातात गावठी बॉम्बचा स्फोट; परिसरात सापडले 25 जिवंत बॉम्ब

रत्नागिरी जिल्ह्यातील जांभारी फाटा परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या हातात गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता तब्बल 20 ते 25 जिवंत गावठी बॉम्ब आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय 45, रा. जांभारी फाटा) या मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास जंगल परिसरात लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना एका ठिकाणी संशयास्पद वस्तू दिसली. नेमकी काय वस्तू आहे हे पाहण्यासाठी त्यांनी ती हातात घेताच अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की त्यांच्या डाव्या हाताच्या पंज्याला गंभीर दुखापत झाली. हाताची बोटे तुटली असून नखं उडाली, त्वचा होरपळली आणि त्या गंभीररीत्या भाजल्या गेल्या.

स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या रेश्मा सुर्वे यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला.घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस आणि बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान परिसरात आणखी 20 ते 25 जिवंत गावठी बॉम्ब आढळून आल्याने पोलिसांनाही धक्का बसला. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके जंगल परिसरात कोणी ठेवली आणि त्यामागे नेमका उद्देश काय होता, याचा आता तपास सुरू आहे.पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून नागरिकांना त्या भागात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी, बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी तपास करत आहेत. या घटनेमुळे जांभारी परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version