Railway Kavach System : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पश्चिम रेल्वेच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या विरार-वडोदरा-सुरत या 344 किलोमीटरच्या टप्प्यावर आता स्वदेशी बनावटीची 'कवच' ही स्वयंचलित रेल्वे संरक्षण यंत्रणा यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रेल्वे अपघातांना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे.
सयाजीनगर एक्स्प्रेस ठरली 'कवच'ची मानकरी
शुक्रवारी दादर रेल्वे स्थानकावरून सुटलेल्या दादर-भुज सयाजीनगर एक्स्प्रेसला (20907) हिरवा झेंडा दाखवून या यंत्रणेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. पश्चिम रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रदीप कुमार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. या यंत्रणेमुळे मुंबई ते दिल्ली या मुख्य मार्गाचा एक मोठा हिस्सा आता पूर्णपणे डिजिटल सुरक्षा कक्षेत आला आहे, ज्यामुळे हाय-स्पीड ट्रेनचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.
काय आहे 'कवच' तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे?
'कवच' हे पूर्णपणे भारतात विकसित केलेले तंत्रज्ञान असून ते युरोपीयन यंत्रणांच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आणि प्रभावी मानले जाते. या यंत्रणेमुळे एकाच रुळावर समोरासमोर दोन गाड्या आल्यास, ती आपोआप ब्रेक लावून मोठा अपघात टाळते. तसेच, लोको पायलटकडून वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यास गाडीचा वेग आपोआप नियंत्रित केला जातो. दाट धुक्यासारख्या प्रतिकूल हवामानातही इंजिनमधील स्क्रीनवर सिग्नलची स्पष्ट माहिती मिळत असल्याने रेल्वेचा वेग कायम राखणे शक्य होते. या प्रकल्पासाठी रेल्वे रुळांवर 8,000 हून अधिक रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅग आणि 57 रेडिओ टॉवर्स उभारण्यात आले आहेत.
हेही वाचा - Mumbai Local News : मुंबईकरांची चांदी! 100 नव्या लोकल गाड्यांची भेट अन्...; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
सप्टेंबरपासून लोकल गाड्याही येणार सुरक्षा कक्षेत
केवळ लांब पल्ल्याच्या गाड्याच नाही, तर मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल गाड्यांनाही लवकरच 'कवच'चे सुरक्षा कवच मिळणार आहे. विरार ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या कामासाठी सप्टेंबर 2026 ची मुदत देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील एकूण 2,667 किलोमीटर मार्गावर ही यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र सरकारने 1,435 कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे भविष्यात रेल्वे प्रवास अधिक गतीमान आणि सुरक्षित होणार आहे.