विजय चिडे – छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या अकरावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत आढळून आला आहे.
नेमके काय घडले?
तेजस्विनी चव्हाण असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती कालपासून अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. कुटुंबीय, पोलिस आणि ग्रामस्थांनी मिळून सुमारे सहा तास शोधमोहीम राबवली. अखेर या शोधमोहिमेदरम्यान तिचा मृतदेह गावालगतच्या एका विहिरीत आढळून आला.
हेही वाचा – धक्कादायक घटना! तापी नदीपात्रात तरुणाचा मृतदेह; दोन दिवसांच्या शोधमोहिमेला अखेर यश
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्विनीचे आई-वडील ऊसतोडणीच्या कामासाठी गेले होते. त्यामुळे ती आजी-आजोबांसोबत राहत होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षणाचा खर्च आणि प्रवासाच्या अडचणींमुळे ती तणावात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे, मात्र तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूमागील नेमके कारण तपास अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे नांदगाव तांडा परिसरात शोककळा पसरली असून, ऐन शिक्षणाच्या वयात विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर