आज मध्य रेल्वेवर तब्बल 15 मिनिटे ते 1 तास उशिराने लोकल धावत होत्या. विशेषतः मुलुंड ते ठाणे दरम्यान मोठा विलंब पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये कापड अडकल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेला आग लागल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखी किती वेळ लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यावेळी भांडूपहून कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल उशिराने धावत असून, लोकल सेवा तब्बल अर्धा तास उशिराने सुरू आहे. तर मुलुंडहून मुंबईच्या दिशेने जाणारी पहिली लोकल रवाना झाली आहे. यादरम्यान लोकल ट्रेनच्या मागे ट्रेन लाईनीत उभ्या झालेल्या दिसत आहेत. प्रवासी जीव धोक्यात घालून ट्रॅक वरून प्रवास करीत आहेत.
अशातच मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत असतानाच भांडुप रेल्वे स्थानकावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. भांडुप स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उतरून प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून लोकल पकडण्यासाठी जात असताना एका युवकाचा एसी ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भांडुपच्या चार नंबर प्लॅटफॉर्मवर उतरून तीन नंबरची गाडी पकडलेला जाताना 21 वर्षीय साहिल थिटे तरुणाचा मृत्यू झाला आहे. धडक इतकी भीषण होती की, तरुण एसी ट्रेनसोबत सुमारे 15 ते 20 फूट लांबपर्यंत फरफटत गेला.
या अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे साहिलचा जागीच मृत्यू झाला. मृत साहिल हा कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. साहिल हा मुलुंड कॉलनीमधील अमर नगर परिसरात वास्तव्यास होता. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि संबंधित कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या दुर्घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.