छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लढवायची होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांना शिवसेनेतून राज्यसभेची निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, अपक्ष निवडणूक लढवण्याचा भूमिकेवर संभाजीराजे ठाम होते. तसेच शिवसेनेने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा घणाघातही संभाजीराजे यांनी केला होता. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाल्यानंतर संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे.
नवी मुंबईत संभाजीराजे यंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरच्या माध्यमातून संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे. शिवरायांच्या गमिनीकावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे स्वागत, असे त्या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. तसेच ‘आज पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा’ राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे २०२४ बाकी है, बॅनरवरील हा मजकूर सर्वांचे लक्ष आकर्षित करत आहे.
संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी न देता कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असून फडणवीसांची निवडणुकीसाठीची रणनिती यशस्वी ठरली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला असून भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी झाले आहेत.